नाशिक – नाशिक आणि त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीला वेग देण्यात आला आहे. कुंभमेळा प्राधिकरणातर्फे कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या घाटांची शास्त्रीय क्षमता निश्चिती, भाविकांची संभाव्य संख्या, साधुग्राम आराखडा आणि एकात्मिक पार्किंग नियोजन या विषयांवर उच्चस्तरीय विचारमंथन बैठकीत चर्चा करण्यात आली.

नाशिक विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. सिंहस्थ २०२७ दरम्यान अपेक्षित भाविकांची संख्या, गर्दीच्या वेळेतील ताण, तसेच प्रमुख घाटांची प्रत्यक्ष भौतिक क्षमता यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक घाटावरील प्रवेशमार्ग, निर्गमन मार्ग, थांबा क्षेत्र आणि सुरक्षित हालचालीची क्षमता यांचे शास्त्रीय मूल्यांकन करण्यावर भर देण्यात आला.

मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गर्दीचा विचार करून माहितीआधारित व संगणकीय विश्लेषणावर आधारित नियोजनाची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. याशिवाय नाशिक येथील साधुग्रामच्या प्रस्तावित आराखड्यावरही चर्चा करण्यात आली. साधुग्राममधील विभागनिहाय नियोजन, अंतर्गत रस्ते व वाहतूक व्यवस्था, प्रवेश नियंत्रण तसेच मूलभूत सुविधांची उपलब्धता याबाबत संबंधित विभागांना सूचनाही देण्यात आल्या.

घाट व्यवस्थापनाशी संलग्न पार्किंग व्यवस्था, कायमस्वरूपी व तात्पुरती पार्किंग स्थळे, शटल बस सेवा, वाहतूक नियोजन, गर्दीचे संगणकीय विश्लेषण आणि आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याची यंत्रणा यांचा एकात्मिक विचार करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. घाट, साधुग्राम आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन परस्पर समन्वयाने करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले. डॉ. प्रवीण गेडाम यांनी सिंहस्थ २०२७ साठी पूर्वतयारी टप्प्यातच अचूक व समन्वयित नियोजन आवश्यक असल्याचे सांगितले. सर्व विभागांनी अद्ययावत माहिती सादर करून व्यवहार्य आणि भाविकाभिमुख आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी, “सिंहस्थ २०२७ साठी आम्ही माहितीआधारित आणि समन्वयित नियोजनावर भर देत आहोत. घाटांची शास्त्रीय क्षमता निश्चिती, एकात्मिक पार्किंग व्यवस्था आणि साधुग्रामचा सुव्यवस्थित आराखडा हे सुरक्षित व सुरळीत व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत.” असे सांगितले.

या बैठकीस नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त सौरिश सहाय यांच्यासह पोलीस, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि विविध पायाभूत सुविधा विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.