नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्याची नांदी ठरणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याचे सर्वांना वेध लागले आहे. ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून दोन मिनिटांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी ध्वजारोहण सोहळ्यासाठी तयार करण्यात आलेले ध्वजस्तंभ आणि धर्मध्वजांविषयी भाविकांमध्ये प्रचंड आकर्षण आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणच्या ध्वजस्तंभांची आणि धर्मध्वजांची रचना वेगळी आहे.
नाशिक येथे मुख्य धर्मध्वजासह गंगा-गोदावरी मंदिरावर ध्वजारोहण होणार आहे. रामकुंड येथे उभारण्यात येणारा मुख्य धर्मध्वज स्तंभ हा ५१ फूट उंच आणि पंचधातूंचा वापर करुन तयार करण्यात आलेला आहे. या स्तंभावर समुद्रमंथनातून बाहेर आलेल्या १४ रत्नांचे प्रतिक साकारण्यात आले आहे. अमृत कलश धरलेला गरुडही स्तंभावर कोरण्यात आला आहे.
दुसरा धर्मध्वज स्तंभ श्री गंगा गोदावरी माता मंदिराजवळ उभारण्यात आला आहे. या स्तंभाची उंची ३१ फूट असून हा स्तंभही पंचधातूचा आहे. या स्तंभावरही समुद्रमंथनातून आलेल्या १४ रत्नांचे चिन्ह आहे. त्यात हलाहल विष (कालकूट), कामधेनु (सुरभि गाय), उच्चैःश्रवा घोडा, ऐरावत हत्ती, कौस्तुभ मणी, कल्पवृक्ष पारिजात, रंभा (अप्सरा), महालक्ष्मी, वारुणी (सुरा/मद्य), चंद्रदेव (चंद्र), धन्वंतरी वैद्य, धनुष्य (हरिधनु), पांचाजन्य शंख, अमृत (अमृतकुंभ) यांचा समावेश असल्याची माहिती, सिंहस्थ कुंभमेळा पुरोहित संघ समितीचे सतीश शुक्ल यांनी दिली.
त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थावर ३१ फूट उंचीचा मुख्य ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. स्तंभाला ६२ किलो पितळाचा मुलामा देण्यात आला आहे. स्तंभावर समुद्र मंथनातून प्राप्त झालेल्या १४ रत्नांचे चित्रण आहे. स्तंभाच्या वरील भागात गरुड अमृतकलश घेऊन जात असल्याचे कोरीव काम करण्यात आले आहे. स्तंभाच्या खाली पूर्व आणि पश्चिम या दिशांना श्रीगणेशाच्या प्रतिमा आहेत. दुसरा ध्वजस्तंभ गोदाघाटावर उभारण्यात आला आहे.
नाशिकचा धर्मध्वज
मुख्य धर्मध्वज हा साडेपंधरा फूट लांब आणि साडेपाच फूट उंचीचा आहे. ध्वजाच्या एका बाजूला बृहस्पतीचे वाहन सिंह, काळाचे प्रतिक म्हणून चंद्र-सूर्य दाखविण्यात आले आहेत. जोपर्यंत चंद्र, सूर्य आहेत, तोपर्यंत कुंभमेळा हा होतच राहणार, असा त्याचा अर्थ सांगितला जातो. मुख्य धर्मध्वजावरील सिंह हा शूरत्वाचे प्रतीक आहे. धर्मध्वजाच्या दुसऱ्या बाजूला अमृतकलश दाखविण्यात आला आहे. तो गोदामातेचे अमरत्वाचे व मुक्तीचे प्रतीक आहे. तसेच श्री आणि ओम हे हिंदू धर्माचे शुभचिन्ह म्हणून दाखवले आहे. मुख्य धर्मध्वजाला बारा रेशीम गोंडे, अंतर्नाद आणि ब्रम्हनादाचे प्रतिक म्हणून १५ घंटा आणि तीन घुंगरू आहेत. ध्वजाच्या चारही बाजूंना सुवर्ण रंगाची जरीची लेस लावण्यात आली आहे.
श्री गंगा गोदावरी पुरोहित संघाचा धर्मध्वज नऊ फूट लांब आणि पाच फूट उंचीचा आहे. या धर्मध्वजाच्या एका बाजूत गोदामातेचे अमरत्वाचे व मुक्तीचे प्रतीक म्हणून अमृतकलश, श्री आणि ओम हे हिंदू धर्माचे शुभचिन्ह दाखविण्यात आले आहे. ध्वजाला नऊ घंटा, सहा रेशमी गोंडे आणि तीन घुंगरु आहेत. गोंडे हे सामाजिक एकतेचे, संघ शक्तीचे प्रतीक आहेत. या धर्मध्वजाच्या दुसऱ्या बाजूला गोदावरी नदीचे वाहन मगर, सूर्य-चंद्र आहेत.
त्र्यंबकेश्वरचा धर्मध्वज
कुशावर्तावरील धर्मध्वजावर सूर्य, चंद्र, बृहस्पती, सिंह, दोन राशी आणि बृहस्पतीच्या भ्रमणचक्राचे प्रतिक म्हणून बारा घंटा, गोदावरी नदीचे वाहन मगर, ओम, स्वस्तिक, दशदिशा दाखविण्यात आल्या आहेत. याशिवाय अमृत मंथन, गणपती, कमळ, कामधेनू, सूर्यदेवाचे वाहन अश्व, ऐरावत, कौस्तुभ मणी, कल्पवृक्ष, रंभा-मेनका, लक्ष्मी, धन्वंतरी, शारंग धनुष्य, पांचजन्य शंख ही चिन्हे आहेत.
