नाशिक – नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभपर्वास शनिवारी दुपारी १२ वाजून दोन मिनिटांनी आरंभ होणार आहे. यानिमित्त दोन्ही ठिकाणी एकाच वेळी ध्वजारोहण करण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, १३ आखाड्यांचे महंत, राज्यपाल जिष्णू देव वर्मा आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबक नगरी सजली आहे. मंदिरे, गोदाकाठ परिसर नेत्रदीपक विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. अवघे शहर झेंडे आणि पताकांनी भगवेमय करण्यात आले आहे. रामकुंड येथील मुख्य धर्मध्वजस्तंभ हा ५१ फूट उंच आणि पंचधातूंचा वापर करून तयार केलेला आहे. तर त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थावर ३१ फूट उंचीचा मुख्य ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. स्तंभाला ६२ किलो पितळाचा मुलामा आहे. नाशिकमधील कार्यक्रमास राष्ट्रपती मुर्मू, तर त्र्यंबकेश्वर येथील कार्यक्रमास मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल, असे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.
नाशिकच्या सोहळ्यानंतर राष्ट्रपती रस्तेमार्गाने त्र्यंबकेश्वरला जातील. त्र्यंबकेश्वर मंदिर तसेच कुशावर्त येथे ध्वजस्तंभाचे दर्शन आणि पूजन करतील. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले असून, नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
सायंकाळी महा गोदाआरती
शनिवारी सायंकाळी नाशिकमधील रामकुंड परिसरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६५०० आदिवासी बांधवांच्या सहभागातून महा गोदाआरती होणार आहे. या उपक्रमातून विश्वविक्रम नोंदविण्याचा प्रयत्न केला जाईल. हिंदू संस्कृतीतील निसर्गपूजनाची परंपरा, आदिवासी समाजाचा गौरव, गोदावरी संवर्धन आणि सामाजिक समरसता या उद्देशांनी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महा गोदाआरतीसाठी पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, निफाड यांसह सात तालुक्यांतील ६५० गाव-पाड्यांमधून आदिवासी बांधव सहभागी होणार आहेत. प्रत्येक गावातून सहा पुरुष आणि चार महिला सहभागी होतील, असे नियोजन आहे.
टपाल तिकिटे, संकेतस्थळाचेही अनावरण
या सोहळ्यात कुंभमेळ्याच्या निमित्ताने निर्मिलेल्या रामकुंड तसेच कुशावर्त तीर्थावर आधारित विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात येणार आहे. या माध्यमातून सिंहस्थाची आध्यात्मिक परंपरा, धार्मिक महत्त्व आणि नाशिक- त्र्यंबकेश्वरचा सांस्कृतिक वारसा राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित होणार आहे. तसेच राष्ट्रपतींच्या हस्ते कुंभमेळा संकेतस्थळाचे अनावरण, कॉफी टेबल बुकचे प्रकाशन, कुंभगीताचे अनावरण असे कार्यक्रम होणार आहेत.
