नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी देश- विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येतील. या भाविकांसाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक पायाभूत सोयी सुविधा उभारणी केली जात आहे. कुंभमेळ्यानिमित्त सुरू झालेली कामे वेळेत पूर्ण होतील याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले. ही सर्व कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होतील याचीही दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले.
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे २५ हजार कोटींची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. मुख्य सचिव अग्रवाल हे या कामांची पाहणी करण्यासाठी व कामांचा आढावा घेण्यासाठी तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी म्हणजे त्यांनी शहरात प्रगतीपथावर असलेल्या कामांची पाहणी करीत माहिती घेतली. द्वारका चौकातील भुयारी मार्ग, तपोवनातील लक्ष्मीनारायण मंदिराजवळ बांधण्यात येणारा समांतर पूल, कपिला संगम, साधुग्राम, गोदावरी नदी काठावर जलसंपदा विभागातर्फे सुरू असलेल्या नवीन घाटांची बांधणी, तसेच महापालिकेतर्फे तपोवन, आगरटाकळी, दसक-पंचक येथे सुरू असलेल्या मलजल शुद्धीकरण प्रकल्पांची पाहणी केली.
त्यानंतर मुख्य सचिवांनी पांडव लेणीजवळील मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन, खत निर्मिती प्रकल्पांची पाहणी केली. जलशुद्धीकरण प्रकल्पाला भेट दिली. राजुर बहुला येथे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनीतर्फे उभारण्यात येणाऱ्या वीज उपकेंद्राचीही मुख्य सचिव अग्रवाल यांनी पाहणी केली.
द्वारका चौकातील सोयी सुविधांचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीचे नियोजन कसे असेल याबद्दल अग्रवाल यांनी जाणून घेतले. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संदीप पंडागळे यांनी या प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. मनपा आयुक्त मनिषा खत्री, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी तपोवन परिसरातील कामांची सविस्तर माहिती दिली. विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे सर्वतोपरी नियोजन करण्यात आल्याचे नमूद केले. विविध कामांना प्रशासकीय मंजुरी प्रदान करून विकास कामे सुरू झाली आहेत. ही विकास कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण होण्यासाठी कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सनियंत्रण करण्यात येत असल्याचे सांगितले. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.
शनिवारी पाहणी, आढावा
राज्याचे मुख्य सचिव अग्रवाल हे शनिवारी पांडवलेणी येथे भेट देणार आहेत. त्यानंतर नाशिकरोड रेल्वे स्थानक येथे सुरू असलेल्या कामांची पाहणी करतील. धुळे रस्त्यावरील वाहनतळ पाहणी करून रामकुंडावरील रामकाल पथच्या कामांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत. स्मार्ट सिटी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळ्याचा आढावाही घेणार आहेत.
