नाशिक: आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर तसेच जिल्ह्यात विविध विकासकामे सुरु आहेत. विकास कामातंर्गत त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याला नवीन इमारत मिळणार आहे. कामाला सुरूवात झाली असून कुंभ पर्वात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या अनुषंगाने या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

आगामी नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वात भाविकांची होणारी गर्दी ही प्रशासनाच्या नियोजनाची कसोटी पाहणारी ठरणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या विभागाच्या वतीने विविध संकल्पना, कृती आराखड्यावर काम सुरू आहे. त्र्यंबकेश्वरची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता तरंगती गर्दीमुळे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर कुमक लागणार असून मूलभूत सुविधांवर भर देण्यात येत आहे.

मागील आठवड्यात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रशासकीय इमारतीचे भूमीपुजन करण्यात आले. या ठिकाणी २००१ चौरस मीटर आवारात ही इमारत बांधण्यात येत आहे. तळ मजला अधिक चार मजली इमारत असेल. बैठक कक्ष असेल. या इमारतीत पहिल्या मजल्यावर तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक १, पंचायत समिती, दुसऱ्या मजल्यावर उपकोषागार, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक २, उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, तिसऱ्या मजल्यावर भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक, सामाजिक वनीकरण, पंचायत समिती, चौथ्या मजल्यावर कृषी, पंचायत समिती, बैठक कक्ष, भांडार कार्यालय असेल, तर पाचव्या मजल्यावर बैठक कक्ष असेल. प्रशासकिय इमारतीचा शुभांरभ होत असतांना सद्यस्थितीत जुन्या त्र्यंबक पोलीस ठाण्याचे नुतनीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

५० कोटींचा निधी

त्र्यंबक पोलीस ठाण्याच्या आवारात दोन इमारती बांधल्या जाणार आहेत. यापैकी एक तीन मजली आणइ एक सहामजली असेल. याविषयी उपअधीक्षक वासुदेव देसले यांनी माहिती दिली. कौलारू पोलीस ठाण्याच्या बाजुला मागील कुंभमेळ्यात इमारत बांधण्यात आली होती. मात्र कामाचा वाढता व्याप पाहता पोलीस ठाण्याचे नुतनीकरण करण्यात येत आहे.

तळमजल्यावर पोलीस ठाणे, नंतर एडीपीओ आणि तिसऱ्या मजल्यावर एक सभागृह राहील. बाजुला सहा मजली इमारत बांधण्यात येणार आहे. याठिकाणी नियंत्रण कक्षासह अन्य महत्वाचे विभाग, अधिकारी आणि कर्मचारी यांना राहण्यासाठी निवासी व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी ५० कोटी हून अधिक निधी प्राप्त झाला असून वर्षभरात हे काम पुर्ण होईल, असे देसले यांनी नमूद केले.