नाशिक : आईच्या फाटक्या लुगड्यास
बाबांच्या फाटक्या धोतरास
अस्तर जोडले आहे
गोधडीखाली जणू आईवडिलांची माया
सतत त्या गोधडीतून जाणवते…
इयत्ता आठवीच्या मराठी पुस्तकातील डॉ. कैलास दौंड यांच्या गोधडी कवितेतील या काही ओळी. आनंदवली येथील महापालिका शाळा क्रमांक १८ च्या विद्यार्थिनींना ही कविता शिकत असतांना गोधडी तयार कशी होते, याचे प्रात्यक्षिक दाखविले गेले. इतकेच नव्हे तर, उन्हाळी सुट्टीतील अभ्यास म्हणून गोधडी तयार करण्यास सांगितले. या उपक्रमातून तयार होणाऱ्या गोधड्या या आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
पाठ्यक्रमातील अभ्यास हा केवळ परीक्षेमध्ये गुण मिळवण्यापुरता असतो, असा समज करून घेतलेल्या पालक आणि विद्यार्थ्यांसाठी आनंदवली येथील महापालिकेच्या शाळेतील गोधडी हा उपक्रम एक परिपाठ आहे. वार्षिक परीक्षेनिमित्त मराठीचा अभ्यास करतांना दौंड यांची कविता अभ्यासात आली. त्यावेळी वर्ग शिक्षिका कुंदा बच्छाव यांनी विद्यार्थ्यांना कवितेचा अर्थ समजावून सांगितला. गोधडी कशी तयार करतात, याचे प्रात्यक्षिकही त्यांनी वर्गात दाखवले. वर्गातील काही मुली आणि शिक्षिका बच्छाव यांनी गोधडी शिवली. परदेशात असलेल्या एका मित्राशी समाजमाध्यमातून चर्चा करत असतांना मुलींबरोबर गोधडी तयार केल्याची काही छायाचित्रे बच्छाव यांनी पाठवली.
त्या मित्राला गोधडी आवडली. त्याने गोधडी खरेदीची तयारीही दर्शविली. बच्छाव यांना ही कल्पना आवडली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना याविषयी सांगितले. त्यातील एकाने गोधडी ३०० रुपयांना खरेदीही केली. विद्यार्थिनींची ही पहिली स्वकमाई होती. गोधडी छानपैकी तयार केल्यास ती परदेशात जाऊ शकते, हा विचार मुलींनाही पटला. उन्हाळी सुट्टीचा उपयोग म्हणून त्यांनी घरी गोधडी शिवायचे ठरविले आहे. सध्या एकमेकींच्या मदतीने तसेच घरातील आई, आजी, काकू अशा नातेवाईकांच्या मदतीने त्या गोधड्या शिवत आहेत. आता पारंपरिक गोधडीला आधुनिक स्वरुप देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी गणितातील वर्तुळ, त्रिकोण,चौकोन, अर्ध वर्तुळ, षटकोन असे वेगवेगळे आकार वापरले जात आहेत. काही चित्रही गोधडीमध्ये येत आहेत.
याविषयी शिक्षिका बच्छाव यांनी माहिती दिली. मुली गोधडी तयार करणार आहेत. ती विकण्याची व्यवस्था कर्मदान फाउंडेशन करणार असून यातून मिळणारी रक्कम विद्यार्थ्यांना त्यांची स्वकमाई म्हणून दिली जाणार आहे. मागील वर्षीही मंडल आर्टच्या रचना मुलींनी उन्हाळी सुट्टीत तयार केल्या होत्या. त्या विकून चार हजार रुपये मिळवले होते, असे बच्छाव यांनी सांगितले.
नाशिक महापालिकेची आनंदवली येथील शाळा क्रमांक १८ ही वेगवेगळ्या उपक्रमांसाठी ओळखली जाते. या शाळेतील शिक्षिका कुंदा बच्छाव यांनी सुट्टींमधील उपक्रम म्हणून विद्यार्थिनींना गोधडी तयार करण्यास सांगितले आहे. या गोधडींची विक्री करुन विद्यार्थिनींना त्यांची स्वकमाई देण्यात येणार आहे.