नाशिक – शहरात सोनसाखळी चोरणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेण्यात इंदिरानगर पोलिसांना यश आले. संशयितांकडून सोन्याचे दागिने, प्राणघातक हत्यार जप्त करण्यात आले.

हेही वाचा – सप्तश्रृंग गड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भाविकांचे हाल

हेही वाचा – गर्भवतीला पुराच्या पाण्यातून झोळीतून नेण्याची कसरत, नंदुरबार जिल्ह्यातील असुविधांची आदिवासींना झळ

शहर परिसरातील गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहता पोलिसांनी नाका तपासणी सुरू केली आहे. याअंतर्गत शहर परिसरात ठिकठिकाणी वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे. इंदिरानगर परिसरात वरिष्ठ निरीक्षक अशोक शरमाळे यांनी पाच अधिकारी आणि ३५ अंमलदारांच्या मदतीने ही मोहीम राबवली. रथचक्र चौक येथे दोन जण दुचाकीने संशयितरित्या फिरत असल्याची माहिती अंमलदार सागर कोळी यांना मिळाली. त्यानुसार पोलीस संबंधित ठिकाणी गेले असता दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचत असल्याचे दिसले. अंमलदार कोळी आणि त्यांचे सहकारी राठोड यांनी दुचाकीस्वारांचा पाठलाग करुन त्यांना पकडले. राणेनगर परिसरात एका महिलेचे मंगळसूत्र खेचल्याची तसेच अंबड परिसरातही सोनसाखळी चोरल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणात परवेज मनियार (२५, रा. सातपूर) आणि दुसरा अल्पवयीन यांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.