नाशिक – खासदार अरविंद सावंत, रवींद्र मिर्लेकर यांच्यासारखे संपर्कप्रमुख असताना नाशिकमध्ये शिवसेनेचा वेगाने विस्तार झाला. त्यांच्याकडून तालुकास्तरावर दौरे होत असत. मिर्लेकर हे अगदी गावोगावी फिरायचे. भर दुपारी दहा ग्रामस्थ भेटले तरी आनंद मानायचे. प्रत्यक्ष जमिनीवर काम आणि संपर्क ठेवणारे हे नेते होते. साधारणत: आठ वर्षांपूर्वी नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी खासदार संजय राऊत यांच्याकडे आली. राऊत हे प्रवक्तेपदाच्या भूमिकेत अधिक राहत असल्याने लोकांमध्ये मिसळणे, तालुका पातळीवरील संपर्काला ओहोटी लागली. नाशिकमध्ये एकाच व्यक्तीवर विश्वास ठेऊन पक्षाचे कामकाज होऊ लागल्याने संघटनात्मक वीण उसवली. कार्यकर्त्यांशी संपर्काऐवजी व्यवस्थापन, वक्तृत्व कौशल्य असणाऱ्या नेत्यावर संपर्कप्रमुखाची जबाबदारी सोपविल्यास दुसरे काय होणार, अशी खदखद आता ठाकरे गटातून व्यक्त होत आहे.
शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उपनेते सुधाकर बडगुजर यांच्यावरील कारवाईनंतर कधीकाळी पक्षाचा बालेकिल्ला राहिलेल्या नाशिकमधील संघटनात्मक स्थितीबाबत निरनिराळे प्रश्न समोर येत आहेत. मुळात शिवसेना एकसंघ असल्यापासून खासदार संजय राऊत आणि बडगुजर यांचे घनिष्ठ संबंध होते. इतरांना डावलून राऊत यांनी नेहमीच त्यांना झुकते माप दिले. त्यामुळे बडगुजर हे महापौर, विधानसभा निवडणुकीची उमेदवारी दोनवेळा मिळवू शकले. महापालिकेत सभागृह नेता, शिवसेनेचे महानगरप्रमुख, जिल्हाप्रमुख आणि उपनेता अशा अनेक संधी त्यांना मिळाल्या होत्या. त्यामुळे शिवसेना दुभंगली, तेव्हा देखील ते खासदार राऊत यांच्याबरोबर राहिले. या जोडगोळीच्या कार्यपद्धतीला वैतागलेल्या अनेकांनी शिवसेनेचा (एकनाथ शिंदे) रस्ता पकडला. अलीकडच्या वितुष्टात खुद्द राऊत यांच्यावरच बडगुजर यांची हकालपट्टी करण्याची वेळ आली.
नाशिकमध्ये शिवसेना बांधणीत अनेक संपर्कप्रमुखांनी मोलाचे योगदान दिले होते. यामध्ये मधुकर सरपोतदार, सूर्यकांत महाडीक, खा. अरविंद सावंत, रवींद्र मिर्लेकर आदींची नावे प्रामुख्याने शिवसैनिकांकडून सांगितली जातात. खासदार सावंत हे संपर्कप्रमुख असताना १९९७ मध्ये पहिल्यांदा नाशिक महापालिकेत शिवसेनेचा भगवा फडकला होता. वसंत गिते हे पहिले महापौर झाले होते जिल्हा परिषदेत लक्षणीय यश मिळाले. सावंत आणि मिर्लेकर यांच्याकडून ग्रामीण भागात शिवसेनेचे जाळे विणण्यावर भर दिला गेला. आमदारांची संख्या वाढली. महापालिकेत दर पंचवार्षिकला जागा वाढल्या. पदाधिकाऱ्यांसह सामान्य कार्यकर्त्याचेही ते म्हणणे जाणून घेत असत. पक्षाची भूमिका मांडतानाच दुरुस्तीला कुठे वाव आहे, हे ते शोधत असत. वेगवेगळी आंदोलने, कार्यक्रम यातून जनतेचे प्रश्न मांडले जात. मागील दशकभरात मात्र संघटनेची घडी विस्कटली.
जिल्ह्यातील संपर्क शहरापुरताच मर्यादित झाला. सुकाणू समितीची बैठक, कधीतरी शिवसैनिकांचे मेळावे, यापलिकडे जनसामान्यांशी नाळ तुटली. स्थानिक संघटनात्मक पदेही जमिनीवर काम करणाऱ्यांऐवजी मर्जीतील धनदांडग्याला मिळू लागली. नाशिकमध्ये बडगुजर अशी एकमेव व्यक्ती होती की, ज्याचे संपर्कप्रमुख राऊत हे ऐकत असत, असे ज्येष्ठ शिवसैनिक सांगतात. जमिनीवर काम करणारा नेता असेल तर पक्ष मोठा होतो. सध्या त्याची प्रकर्षाने उणीव असल्याची त्यांची भावना आहे.