नाशिक – सत्ताधारी राजकीय पक्षांकडून फोडाफोडीच्या राजकारणातून पक्षाला सातत्याने धक्के दिले जात असल्याने शिवसेनेने (उद्धव ठाकरे) शिवसैनिकांची मोट बांधून त्यास प्रत्युत्तर देण्याची तयारी चालविली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या प्रभागनिहाय बैठकांमधून पक्ष सांभाळण्याची जबाबदारी सामान्य शिवसैनिकांवर आल्याचा संदेश देण्यात येत आहे. नेते, माजी नगरसेवकांनी पक्षांतर केले तरी मूळचा शिवसैनिक हललेला नाही. दुसरी फळी सक्रिय करून निवडणुकीची मोर्चेबांधणी केली जात आहे.
शिवसेना दुभंगल्यापासून अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात गेले. अलीकडेच पक्षातून हकालपट्टी झालेले उपनेते सुधाकर बडगुजर हे माजीमंत्री आणि काही माजी नगरसेवकांना घेऊन भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले. ठाकरे गटात मोठी पडझड सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मातोश्रीवरून बैठका घेऊन निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार नाशिकरोड, पंचवटीसह अन्य काही विभागात आठहून अधिक बैठका झाल्या आहेत. या माध्यमातून संभाव्य पडझड रोखणे आणि शिवसैनिकांना सक्रिय करण्यावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी स्थापन केलेला हा पक्ष आहे. परंतु, कोणीतरी येते आणि पक्ष चोरून नेते. ज्यांना बाळासाहेबांनी मोठे पद दिले, मोठे केले, तेच आता स्वत:च्या फायद्यासाठी पक्ष सोडून जात आहेत. त्यामुळे हा पक्ष सांभाळण्याची जबाबदारी आता आपल्यासारख्या सामान्य शिवसैनिकांवर आल्याची जाणीव पदाधिकाऱ्यांकडून करून दिली जाते. ती जबाबदारी पार पाडण्याची वेळ आता आल्याकडे बैठकीतून लक्ष वेधले जाते. या बैठकीत खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांच्यासह उपनेते दत्ता गायकवाड आणि सुनील बागूल, माजी आमदार वसंत गिते, राज्य संघटक विनायक पांडे यांच्याकडून मार्गदर्शन केले जात आहे.
नाशिकरोडमधील सर्व प्रभागात बैठका पूर्ण झाल्या. पंचवटी आणि अन्य काही प्रभागात बैठका सुरू आहेत. प्रशासकीय राजवटीत शहराची काय अवस्था झाली, हे मुख्यत्वे शहरवासीयांसमोर मांडले जाईल. माजी नगरसेवक आणि काही नेते पक्ष सोडून गेले असले तरी शिवसैनिक कुठेही गेलेला नाही. पक्षाची दुसरी फळी तयार आहे. अनेकांना इच्छा असूनही निवडणुकीत कधी संधी मिळाली नव्हती. सर्वांच्या सोबतीने आता तयारी केली जात आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.डी. जी. सूर्यवंशी (जिल्हाप्रमुख, ठाकरे गट)