नाशिक : आदिवासीबहुल सुरगाणा तालुक्यातील उधमाळ हे गाव जगातील रात्रीच्या आकाशाच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या डार्कस्काय इंटरनॅशनल या संस्थेकडून प्रमाणित होणारे भारतातील पहिले ‘डार्क स्काय कम्युनिटी’ गाव ठरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या उपक्रमामुळे नाशिकला खगोल पर्यटन अर्थात ‘अॅस्ट्रो-टुरिझम’ क्षेत्रात नवी ओळख मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी आवश्यक निधीला नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव आयुष प्रसाद यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्र आणि अवकाश संशोधनाविषयी आवड निर्माण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे तसेच जिज्ञासू वृत्तीला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. संविधानात नमूद केलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि चिकित्सक वृत्ती विकसित करण्याच्या मूलभूत कर्तव्याच्या अनुषंगाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
उधमाळचे नैसर्गिकरीत्या स्वच्छ आणि अंधारमय आकाश अवकाश निरीक्षणासाठी अत्यंत अनुकूल मानले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आकाश निरीक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. उधमाळ ग्रामसभेने पेसा कायद्यांतर्गत अंधारमय आकाशाचे संवर्धन आणि जबाबदार बाह्य प्रकाशयोजनांना प्रोत्साहन देणारा ठराव मंजूर केला आहे. या ठरावाद्वारे प्रकाश प्रदूषण कमी करण्यासाठी सुरक्षित, ऊर्जा-कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक प्रकाशयोजनांचा अवलंब करण्यावर भर देण्यात आला आहे.
या उपक्रमासाठी जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना २०२६-२७ अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेमधून ४२.१४ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून रात्रीच्या आकाशाच्या गुणवत्तेचे मूल्यांकन, जबाबदार प्रकाशयोजना, जनजागृती कार्यक्रम तसेच स्थानिक युवकांचे प्रशिक्षण असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. राज्य शासनाच्या प्रस्तावित ‘राज्य डार्क स्काय धोरणा’शी हा उपक्रम सुसंगत असून, रात्रीच्या आकाश संवर्धनाच्या क्षेत्रात नाशिक जिल्हा राज्यात अग्रणी भूमिका बजावेल, असा विश्वास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केला.
खगोल पर्यटनाला चालना
जिल्हा नियोजन समितीतर्फे पर्यटन विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात असून, त्यामध्ये खगोल पर्यटन (अॅस्ट्रो-टुरिझम) ही नवी संकल्पना महत्त्वाची ठरणार आहे. या उपक्रमामुळे उधमाळसह परिसरातील गावांमध्ये नैसर्गिक वारसा जपत शाश्वत पर्यटनाला चालना मिळेल. त्याचबरोबर स्थानिक युवकांसाठी रोजगार आणि उपजीविकेच्या नव्या संधीही उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रकाश प्रदूषणाबाबत जनजागृती
रात्रीचे गडद आकाश हे मानवी ज्ञानाचे सर्वात प्राचीन स्रोत मानले जाते. उधमाळचे अंधारमय आकाश जपत विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्राविषयी जिज्ञासा निर्माण करणे, वैज्ञानिक प्रश्न विचारण्याची सवय विकसित करणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बळकट करणे, हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासोबतच प्रकाश प्रदूषणाचे दुष्परिणाम, रात्री सक्रिय असणाऱ्या वन्यजीवांचे संरक्षण आणि पर्यावरणपूरक प्रकाशयोजनांचे महत्त्व याबाबतही जनजागृती केली जाणार आहे. डार्कस्काय इंटरनॅशनल ही प्रकाश प्रदूषणाविरोधात कार्य करणारी जगातील मान्यताप्राप्त संस्था असून, जनजागृती, संवर्धन आणि प्रभावी धोरणांच्या माध्यमातून रात्रीचे नैसर्गिक वातावरण जपणे तसेच समुदाय आणि वन्यजीवांचे संरक्षण करणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. उधमाळचा या उपक्रमात समावेश होणे ही नाशिकसाठी तसेच देशासाठी महत्त्वाची उपलब्धी ठरणार आहे.
