मालेगाव : नाशिक जिल्ह्याला सोमवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले. विशेषतः मालेगाव, बागलाण आणि देवळा या तालुक्यांवर कोसळलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काढणीला आलेला नगदी कांदा आणि बहरलेल्या डाळिंबाच्या बागांचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

​सोमवारी दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक भागात पावसाबरोबर गारांचाही जोर होता. काही गावांमध्ये शेतात चार ते सहा इंचांपर्यंत गारांचा पांढरा शुभ्र थर साचल्याचे दृश्य होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फेरले गेले आहे.

कांदा, डाळिंबाला जबर फटका

या अस्मानी संकटामुळे काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.​ विशेषत: कांदा आणि डाळिंबाला मोठा फटका बसला आहे.​ सध्या परिसरात कांदा काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, गारांच्या प्रचंड मारामुळे कांदा पिकाची पात वाकली किंवा तुटून पडली आहे. गारांच्या वर्षावामुळे तयार कांद्याच्या मानेवर आणि वरच्या भागावर जखमा झाल्या असून, त्यामुळे कांदा सडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गारांचा मार लागलेल्या कांद्याची साठवणूक क्षमता पूर्णपणे नष्ट होते, त्यामुळे हा कांदा चाळीत साठवणे शक्य होणार नाही. परिणामी, शेतकऱ्यांना हा माल कवडीमोलाने विकावा लागण्याची भीती निर्माण झाली आहे. ​

दुसरीकडे, डाळिंबाच्या बागांनाही या नैसर्गिक संकटाचा मोठा फटका बसला आहे. गारांच्या तडाख्याने डाळिंबाची फुले आणि फळे गळून पडली आहेत. झाडावर शिल्लक राहिलेल्या फळांना तडे गेले असून, जखमांमुळे ही फळे आता खराब होऊ लागली आहेत. आंब्याच्या झाडांवरील फळांचीही मोठी गळ झाली आहे.

​बळीराजाची चिंता वाढली

‘​हातातोंडाशी आलेला घास या अवकाळीने हिरावून नेला आहे’, अशी आर्त हाक सध्या नुकसानग्रस्त भागातील शेतकरी देत आहेत. खते,बियाणे व मजुरीसाठी शेतात मोठे भांडवल गुंतवावे लागले आहे. मात्र,उत्पन्नाची खात्री मावळल्याने बँकांचे कर्ज व अन्य देणी कशी फेडावीत,असा गंभीर प्रश्न आता शेतकरी वर्गासमोर उभा ठाकला आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मालेगाव, बागलाण आणि देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. या अस्मानी संकटामुळे ऐन उन्हाळ्यात ग्रामीण भागातील आर्थिक चक्र कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.

मंत्री दादा भुसे यांच्याकडून पाहणी

अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानाची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मालेगाव तालुक्यातील ढवळेश्वर,पांढरुण व डोंगराळे परिसर तसेच बागलाण तालुक्यातील आराई,भाक्षी व चौगाव रोड येथे नुकसान झालेल्या पिकांची मंत्री भुसे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

सटाण्याचे तहसीलदार कैलास चावडे, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मंत्री भुसे यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी देखील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

माजी आमदार दीपिका चव्हाण आक्रमक

आधीच शेतपिकांना वाजवी भाव मिळत नसताना अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे. कांदा, मका, गहू, हरभरा, डाळींब, द्राक्ष या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. तेव्हा शासनाने नुसते कागदी घोडे न नाचवता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने व भरीव मदत द्यावी, असा आग्रह माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी धरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन पाठवून बागलाणमध्ये झालेल्या नुकसानीबद्दलची माहिती त्यांनी दिली आहे.