नाशिक : एप्रिलच्या प्रारंभी सलग दोन दिवस झालेली गारपीट आणि पावसाने जिल्ह्यात ३६७ गावांतील ३१ हजार ३८७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका काढणीवर आलेल्या उन्हाळ कांद्याला बसला. २५ हजार ५०० हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले. तर गहू, डाळिंब व भाजीपाल्यालाही मोठी झळ बसली.
मार्च महिन्यात अधूनमधून अवकाळी पावसाने काही भागात तडाखा दिला होता. मार्चच्या अखेरच्या टप्प्यात वादळी पाऊस आणि गारपीटीचे कायम राहिलेले सत्र एप्रिलच्या सुरूवातीला सुरू राहिले. एक आणि दोन एप्रिल रोजी बागलाण, निफाड, सिन्नर, दिंडोरी, मालेगाव, इगतपुरी, नाशिक, कळवण, देवळा, येवला या तालुक्यात काही भागात गारपीट तर अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाला.
या नैसर्गिक संकटात ३७६ गावे बाधित झाली असून तब्बल ४४ हजार १३१ शेतकऱ्यांना फटका बसला. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार २५ हजार ५०० हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले. उन्हाळ कांद्याची सध्या सर्वत्र काढणी सुरू आहे. त्याच सुमारास कोसळलेल्या पावसाने काढणीवर आलेला आणि शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.
तशीच स्थिती गहू पिकाची झाली. वादळी पाऊस, गारपिटीत १९६८ हेक्टरवरील गव्हाचे नुकसान झाले. १८७० हेक्टरवरील डाळिंब बाग, २८४ हेक्टरवरील मका, ९५६ हेक्टरवरील भाजीपाला, ६४१ हेक्टरवरील द्राक्ष, सात हेक्टरवरील आंबा पिकाचे नुकसान झाले. पावसामुळे सटाणा तालुक्यात सर्वाधिक २५ हजार ६२२ शेतकरी बाधित झाले. त्या खालोखाल निफाड (८९१५), सिन्नर (३६६७), मालेगाव (३४०५), कळवण (१२९२), इगतपुरी (६१०), येवला (३०) तर देवळा (१९) अशी बाधित शेतकऱ्यांची आकडेवारी आहे.
मार्चमध्येही ३० हजार हेक्टरचे नुकसान
मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान केले होते. या महिन्यात जिल्ह्यातील २३७ गावातील ४२ हजार ३८६ शेतकरी बाधित झाले होते. २९ हजार ८११ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये २२ हजार ९०० हेक्टरवरील कांदा, २२६० हेक्टरवरील गहू, ३४३ हेक्टरवरील भाजीपाला, ३२३७ हेक्टरवरील डाळिंब, २६१ हेक्टरवरील द्राक्ष, ६२९ हेक्टरवरील मक्याचे नुकसान झाले.
