नाशिक – महामंडळाच्या उपाध्यक्षपदाच्या मोबदल्यात विधान परिषदेची नाशिकची जागा भाजपकडे घेऊन त्यावर आपल्या खंद्या समर्थकाची वर्णी लावण्याच्या कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांवर शिवसेना शिंदे गटाने पाणी फेरले आहे. महायुतीतील वाटाघाटीत नाशिकची जागा अखेरीस शिवसेना शिंदे गटाकडे गेल्यामुळे महाजन यांच्यासह आधीच अर्ज दाखल करून एबी अर्जाची प्रतिक्षा करणारे त्यांचे समर्थक गणेश गिते यांनाही धक्का बसला. शिंदे गटाने माजी आमदार नरेंद्र दराडे यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर केली. महायुतीतील अंतर्गत संघर्षात नाशिकला आजतागायत पालकमंत्री लाभलेला नाही. दुसरीकडे कुंभमेळ्याच्या माध्यमातून मंत्री महाजन यांच्या नाशिकमधील वाढत्या वर्चस्वाला मित्रपक्षाने तुर्तास शह दिल्याचे चित्र समोर आले आहे.
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस आहे. तत्पुर्वी म्हणजे रविवारी रात्री भाजपने राज्यातील विधान परिषदेच्या १० आणि नागपूर पोट निवडणुकीतील एक अशी एकूण ११ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये पक्षाला नाशिक ऐवजी छत्रपती संभाजीनगरची जागा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. नागपूरमधील पोट निवडणूक वगळता उर्वरित १६ जागांवर महायुतीत प्रचंड रस्सीखेच सुरू होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यापैकी एक जागा भाजप लढविणार असल्याचे म्हटले होते. नाशिकमध्ये भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने ही जागा शिवसेना शिंदे गटाकडून काढून घेण्याची तयारी भाजपने केली होती. नाशिकच्या जागेच्या मोबदल्यात शिवसेना शिंदे गटाला एखाद्या महामंडळाचे उपाध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव भाजपकडून मांडला गेला होता. दरम्यानच्या काळात कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गिते यांनी भाजपकडून आणि अपक्षही उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांचे सूचक व अनुमोदक सर्व भाजपची मंडळी होती. कोणत्याही परिस्थितीत मंत्री गिरीश महाजन हे नाशिकची जागा भाजपसाठी सोडवून आणतील, असा विश्वास गणेश गितेंसह भाजपच्या मंडळींना होता. परंतु, ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे गेल्यामुळे त्यांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
वर्चस्वावरून चढाओढ
कुंभनगरी नाशिक जिल्ह्यातील वर्चस्वावरून महायुतीत सुरूवातीपासून मतभेद आहेत. त्यातून गिरीश महाजन यांना जाहीर झालेले पालकमंत्रीपद मिळू शकले नव्हते. कुंभमेळा नियोजनातून मंत्री महाजन यांनी नाशिक जिल्ह्यावर पुन्हा आपली पकड मजबूत केली. नाशिक महापालिकेत स्वबळावर एकहाती सत्ता प्राप्त केली. वरिष्ठांच्या निर्णयामुळे महापालिकेतील सत्तेत शिवसेना शिंदे गटाला इच्छा नसताना भाजपला वाटा द्यावा लागला. मंत्री महाजन यांच्या राजकीय डावपेचांमुळे पक्षाच्या स्थानिक लोकप्रतिनिधींची नाराजी प्रगट झालेली आहे. महाजन यांच्या वाढत्या प्रभावाने मित्रपक्षांची वेगळी स्थिती नाही. शिवसेना शिंदे गटाच्या शिवसंपर्क यात्रेत कुंभमेळा नियोजनातून मित्रपक्षांना बाजूला ठेवल्याची खदखद व्यक्त झाली होती.
गणेश गिते काय करणार?
नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांचा प्रभाव पाहता विधान परिषदेची नाशिकची जागा शिंदे गटाला गमवावी लागणार असल्याची साशंकता व्यक्त झाली होती. तथापि, जागा वाटपाच्या वाटाघाटीत शिवसेना शिंदे गटाने भाजपवर मात करीत ही जागा आपल्याकडे राखण्यात यश मिळवले. विधान परिषदेच्या या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाने माजी आमदार नरेंद्र दराडे यांनाच पुन्हा रिंगणात उतरवले आहे. नाशिकची जागा भाजपकडे खेचण्याचा प्रयत्न फोल ठरल्यानंतर अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणारे गणेश गिते हे उमेदवारी कायम ठेवतात की माघार घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
