नाशिक – विधान परिषद निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याकरिता अवघे दोन दिवस बाकी आहे. परंतु, अजूनही महायुती किंवा महाविकास आघाडीकडून नाशिक मतदारसंघासाठी उमेदवारांची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे इच्छुकांमध्ये धाकधूक वाढत असताना काही जणांनी मात्र पक्षाकडून उमेदवारी नाही मिळाली तरी अपक्ष म्हणून का होईना उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला असल्याने नाशिकची निवडणूक कमालीची चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.. विशेषत्वाने महायुतीमधील घटक पक्षांमध्येच किंवा त्यांच्याशी संबंधित अधिकृत उमेदवार आणि अपक्ष उमेदवार यांच्यातच ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेची निवडणूक म्हणजे प्रचंड प्रमाणातील अर्थकारण असल्याने महाविकास आघाडीकडून संख्याबळ नसताना कोणी उमेदवार अर्थकारणाच्या बाबतीत इतरांची बरोबरी करणे सध्यातरी अवघड दिसत आहे. महायुतीत नाशिकची जागा भाजपला सुटणार की शिवसेनेच्या शिंदे गटाला, याविषयीचा सस्पेन्स अजूनही कायम आहे.
भाजपचे नाशिक शहर उपाध्यक्ष निलेश बोरा हे नाशिकच्या जागेसाठी इच्छुक आहेत. नाशिक महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी बजावलेली भूमिका भाजपसाठी महत्त्वाची ठरली होती. परंतु, उमेदवारीसाठी बोरा यांची त्यांचेच मित्र असलेले माजी नगरसेवक आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते यांच्याशी स्पर्धा आहे. गणेश गीते यांनीही अर्ज भरला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी गणेश गीते यांनी आपण पक्षाचे उमेदवार म्हणून भाजपकडून उमेदवारी अर्ज भरत असल्याचे नमूद केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आपले नेते गिरीश महाजन यांनी नाशिक विधान परिषदेच्या जागेसाठी आश्वासन दिले होते. विधान परिषद निवडणुकीत नाशिकची जागा लढवण्याचा शब्द दिल्यामुळेच आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्याचा दावा गणेश गीते यांनी केला आहे.
भाजपचे गणेश गीते हे विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जातात. भाजपच्या वरिष्ठा नेत्यांनी त्यांना उमेदवारीसाठी खरोखर आश्वासन दिले होते का, आणि जर गणेश गीते म्हणतात, त्याप्रमाणे आश्वासन देण्यात आले असेल तर वरिष्ठ नेते आश्वासन पाळतात का, हे पाहावे लागेल. गणेश गीते हे प्रचंड महत्वाकांक्षी नेते आहेत. त्यामुळेच पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास ते अपक्ष म्हणूनही रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. .दुसरीकडे नाशिकच्या जागेसाठी राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ हेही आग्रही असल्याचे सांगण्यात येते.
नाशिकची जागा एकसंघ शिवसेनेकडे होती. विद्यमान आमदार नरेंद्र दराडे हे शिवसेना विभागल्यानंतर शिंदे गटाकडे गेले. नाशिकची जागा शिंदे गटाकडे आल्यास विद्यमान आमदार म्हणून नरेंद्र दराडे यांना पुन्हा उमेदवारी दिली जाईल की कोणा नवीन नावाचा विचार करण्यात येईल, याबाबतही स्पष्टता झालेली नाही. उध्दव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात सामील होताना दराडे यांना विधान परिषदेत उमेदवारीचे आश्वासन देण्यात आले होते, असे म्हटले जाते. एकनाथ शिंदे आपले आश्वासन पूर्ण करतात का, याविषयी चर्चा रंगली आहे.
महायुतीतील विसंवादाचा फायदा उठविण्याइतपत महाविकास आघाडीत शक्ती नाही. त्यांच्याकडे संख्याबळही नाही. असे असतानाही महाविकास आघाडी निवडणूक लढविणार आहे. मविआकडून नाशिकची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला सोडण्यात आली असल्याचे सांगण्यात येते. नाफेडचे संचालक केदा आहेर यांनी अर्ज खरेदी केला आहे. महाविकास आघाडी कदाचित केदा आहेर यांच्यामागे आपली ताकदक उभी करण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून माजी आमदार वसंत गिते, निफाडचे ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम यांनी अर्ज खरेदी केले असल्याने ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीतही तेही आले आहेत. भाजप आणि शिंदे गट स्वतंत्रपणे लढले, तर महाविकास आघाडीची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
