नाशिक – विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे गणेश गिते यांचे बंधू गोकुळ गिते हे विजयी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे आणि समर्थक मतमोजणी केंद्रातून बाहेर पडले. मतमोजणीवेळी गिते आणि दराडे समर्थकांमध्ये धक्काबुक्की होऊन गोंधळ उडाला होता. मतदानात भाजप-शिवसेनेत ‘क्रॉस व्होटिंग’ झाल्याचे सांगितले गेले. मतमोजणीतून त्यावर शिक्कामोर्तब झाले. या निकालावर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी ‘माझा विश्वासघात झाला’ अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली.

विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघासाठी ६१९ पैकी ६१८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर अपक्ष उमेदवार गोकुळ गिते हे समर्थकांसह दाखल झाले. भाजपशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंधित उमेदवारांच्या बंडखोरीमुळे नाशिकची निवडणूक सुरूवातीपासून चांगलीच गाजली होती. बंडखोरांना थोपवण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांना अनेकदा नाशिकमध्ये यावे लागले होते. माघारीची मुदत संपल्यानंतर भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे आणि भाजपचे माजी स्थायी सभापती गणेश गिते यांचे बंधू गोकुळ गिते यांची मंत्री सामंत यांना अक्षरश: मनधरणी करावी लागली होती. हिरे यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर, गोकुळ गिते यांनी कुणालाही पाठिंबा न देता केवळ प्रचार थांबविण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता होती. शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमवेत हिरे आणि गिते या दोन्ही उमेदवारांचे नाव मतपत्रिकेत राहिले. हे लक्षात घेऊन दगाफटका होऊ नये म्हणून शिंदे गटाने बरीच खबरदारी घेतली होती. नाशिक महापालिकेतील सर्व नगरसेवकांना सहलीला नेले. परंतु, ऐनवेळी भाजप-शिवसेनेत बिनसले. भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील काही घटकांनी गोकुळ गिते यांना मदत केल्यामुळे दराडे पराभूत झाल्याची भावना समर्थकांमधून उमटत आहे.

मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर अर्धा तासात गोकुळ गिते यांना पहिल्या पसंतीची ३५७ तर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना २४८ मते मिळाल्याचे समोर आले. अपक्ष उमेदवार गोकुळ गिते विजयी झाल्याचे लक्षात येताच नरेंद्र दराडे आणि त्यांचे समर्थक मतमोजणी केंद्रातून बाहेर पडले. यावेळी गिते समर्थकांकडून मोठी घोषणाबाजी करण्यात आली. त्याला दराडे समर्थकांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. किशोर दराडे यांनी घोषणाबाजी करू नका, असे सुनावल्याचे सांगितले जाते. मोटारीतून बाहेर पडताना नरेंद्र दराडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी महायुतीच्या नेत्यांचा नामोल्लेख न करता तीव्र रोष प्रगट केला. ‘माझा विश्वासघात झाला’ अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. कोणी विश्वासघात केला हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. महायुती व भाजपच्या नेत्यांकडे त्यांचा मुख्यत्वे रोख होता. परंतु त्यांनी कुणाचे नांव घेतले नाही.