नाशिक – विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होत असल्याचे कारण देत शिवसेनेने (उद्धव ठाकरे) नाशिकच्या जागेवर उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाने ऐनवेळी रिंगणातून माघार घेतल्याने या जागेवर तूर्तास महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार नाही. घोडेबाजारात सामील होण्याइतपत सक्षम उमेदवार न मिळाल्याने ठाकरे गट निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडल्याचा लाभ कोणाला होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. चर्चेअंती नाशिक विधान परिषद निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मिर्लेकर यांनी पत्रकारांना सांगितले. महाराष्ट्रात अतिशय घाणेरडे राजकारण सुरू असून ते अनाकलनीय आहे.
निवडणुकीत घोडेबाजाराला ऊत आला आहे. यात सहभागी होण्यापेक्षा निवडणूक न लढविलेली चांगली, असा अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पाठविण्यात आला होता. पक्षप्रमुखांनी त्यास संमती दिली. महाविकास आघाडीचा उमेदवार असेल तर त्याला पाठिंबा द्यायचा आणि नसेल तर कुठल्याही अपक्षाला किंवा कुणालाही पाठिंबा द्यायचा नाही, अशी भूमिका मिर्लेकर यांनी मांडली. निवडणुकीत घोडेबाजार करणाऱ्या लोकांबरोबर जाणे संयुक्तिक नव्हते. पक्षाकडे वसंत गिते, अनिल कदम यांच्यासारखे सक्षम उमेदवार होते. परंतु, सर्व मतदारांपर्यत पोहोचण्यात पुरे पडता येईल की नाही, याबद्दल असमर्थता दर्शविली गेली, असे त्यांनी नमूद केले.
ठाकरे गटाचे जिल्ह्यात ५२ सदस्य अर्थात मतदार आहेत. ते कुणाला मतदान करणार, यावर मिर्लेकर यांनी हे त्या, त्या सदस्यांच्या आकलन शक्तीवर असून आपण प्रामाणिकपणे, नैतिकतेने पुढे जायचे की घोडेबाजारात सामील व्हायचे. या संदर्भात ५२ सदस्यांची बैठक घेतली जाईल. पक्षप्रमुख जो आदेश देतील, तो संबंधितांपर्यंत पोहोचवला जाईल. नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार नाही. कोणी तसा अर्ज भरला असेल तर त्याची कल्पना नाही.
अपक्ष उमेदवारीतून जो घोडेबाजार होणार आहे, त्या पापात आम्हाला सहभागी व्हायचे नसल्याचे वरिष्ठांना कळविण्यात आले होते. महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी अपक्षाला पाठिंबा दिला तरी ठाकरे गट त्यास पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ठाकरे गटाच्या माघारीचा लाभ बंडखोरांना होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.
बंडखोरांना बळ?
विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नऊ उमेदवारांनी १४ अर्ज दाखल केले आहेत. यात भाजपशी संबंधित गणेश गिते, त्यांचे बंधू गोकूळ गिते तसेच प्रसाद हिरे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निवृत्ती बोडके आणि विष्णू म्हैसधुणे यांचाही समावेश आहे. ठाकरे गटाने निवडणुकीतून माघार घेतली, तर महाविकास आघाडीतील अन्य पक्षांचाही अधिकृत उमेदवार रिंगणात नाही. या स्थितीचा पुरेपूर लाभ उठविण्याचा प्रयत्न सक्षम अपक्ष उमेदवाराकडून घेतला जाऊ शकतो.
गतवेळी बाजेरिया कसे निवडून आले?
शिवसेना (उद्धव ठाकरे) ठाकरे गटाने विधान परिषदेच्या नाशिकच्या निवडणुकीतून माघार घेताना हिंगोली-परभणीतून मागील निवडणुकीत निवडून आलेल्या विप्लव बाजेरिया यांचा दाखला दिला. नाशिकचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी मागील निवडणुकीत बुलढाणा की अमरावतीचे बाजोरिया जिथे काहीही संबंध नाही, अशा हिंगोली-परभणीतून निवडून आले होते, जिथे एकही त्यांचा माणूस नसताना ते तिकडून निवडून आले. कुठल्या जोरावर असा प्रश्न केला. हा जो प्रकार आहे, त्यात आम्ही सहभागी होऊ शकत नाही. त्यामुळे आपण नाशिकपुरता निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे मिर्लेकर यांनी सांगितले.
