नाशिक: विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघात माघारीची मुदत गुरुवारी संपत असताना मित्रपक्षातील बंडखोरीमुळे शिवसेनेची (एकनाथ शिंदे) चिंता वाढली आहे. शिंदे गटाचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत हे नाशिकमध्ये तळ ठोकून असून माघारीसाठी बंडखोरांची त्यांनी घरोघरी जाऊन मनधरणी केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) गटातील बंडखोरांशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला. बंडखोरी करणारे भाजपचे गणेश गिते आणि त्यांचे बंधू गोकूळ गिते यांची समजूत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन काढतील आणि त्यांची माघारी होईल, असा विश्वास मंत्री सामंत यांनी व्यक्त केला आहे. आपल्या मार्गातील अडसर दूर करण्यासाठी शिवसेना शिंदे गट सक्रिय झाला असून त्यांची संपूर्ण भिस्त भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्यावर असल्याचे अधोरेखीत झाले आहे.
विधान परिषदेच्या नाशिकच्या जागेवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात जोरदार रस्सीखेच झाली होती. वाटाघाटीत ही जागा शिंदे गटाला मिळाली खरी, पण मित्र पक्षांतील बंडखोरी, शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार न देण्याची” केलेली खेळी यामुळे शिंदे गटाचे नरेंद्र दराडे यांच्यासमोर आव्हान उभे ठाकण्याची स्थिती निर्माण झाली आहे. भाजपचे प्राबल्य असणाऱ्या या मतदारसंघात नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून यात भाजपशी संबंधित गणेश गिते, त्यांचे बंधू गोकूळ गिते तसेच प्रसाद हिरे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निवृत्ती बोडके आणि विष्णू म्हैसधुणे यांचाही समावेश आहे.
माघारीची मुदत गुरूवारी संपुष्टात येत असल्याने बंडखोरी रोखण्यासाठी मंत्री उदय सामंत हे मंगळवारीच नाशिकमध्ये दाखल झाले. उमेदवार, प्रामुख्याने बंडखोरांशी त्यांनी चर्चा केल्याचे सांगितले जाते. बुधवारी सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी अनावधानाने भरलेले उमेदवारी अर्ज, त्या, त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मागे घेण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी नमूद केले. दराडेंच्या उमेदवारीवरून शिंदे गटात कुठलीही नाराजी नसल्याचा दावा त्यांनी केला.
गिते बंधूंची धास्ती का ?
महापालिकेचे माजी स्थायी सभापती गणेश गिते आणि त्यांचे बंधू गोकूळ हे निवडणुकीवर विविध मार्गाने प्रभाव टाकू शकतात, हे लक्षात आल्यावर शिंदे गट त्यांची बंडखोरी रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मंत्री उदय सामंत यांनी काही उमेदवारांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. गिते हे नाशिकमध्ये असते तर आपण त्यांचीही भेट घेतली असती, असे त्यांनी नमूद केले. गणेश गिते हे मुंबईत असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्याची आपली माहिती आहे. गिते बंधूंची उमेदवारी मागे घेण्यासाठी मंत्री महाजन यांनी पुढाकार घेतला आहे. ते चर्चा करून समजूत काढतील. गिते बंधू हे माघार घेतील आणि नरेंद्र दराडे यांचा विजय सुकर होईल, ही आम्हाला खात्री आहे.
गणेश गिते यांच्या प्रतिक्रियांमधूनही ते मंत्री महाजन यांनी सांगितल्यावर उमेदवारी नक्की मागे घेतील असे दिसून आले, याकडे सामंत यांनी लक्ष वेधले. गणेश गिते यांचा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला गेल्याच्या प्रश्नावर सामंत यांनी कुणीतरी बनावट कथानक रचून संभ्रम निर्माण करीत असल्याचे सांगितले. गिते यांच्या विरोधात अर्ज करून अडचणीत आणण्याची शिवसेनेची पद्धत नाही. बनावट कथानकातून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सूचित केले.
