नाशिक – ग्रामीण भागातील सर्व रस्त्यांची दुरावस्था झाल्याने अपघात होऊ लागले आहेत. या प्रश्नाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने मंगळवारी त्र्यंबकेश्वर भागातील ग्रामस्थ आक्रमक झाले. कुठलीही पूर्वसूचना न देता ग्रामस्थांनी आंबोली घाट परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनाची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
त्र्यंबकेश्वर येथून जव्हार, मोखाडा, पालघरकडे जाण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्याने सातत्याने वाहनांची वर्दळ असते. त्यातच पावसामुळे पर्यटकांच्या वाहनांची संख्याही वाढली आहे. परंतु, या प्रमुख रस्त्यासह परिसरातील इतर रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे अनेकवेळा अपघातही झाले आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नांदगाव कोहली, खरावळ, वेलुंजे, हेदुली, वारसविहिर या गावाला जाणारा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात आला.
कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने पहिल्याच पावसात रस्ता दिसेनासा झाल्याने या गावांकडे जाणारी बससेवाही बंद झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या गावांमधील रुग्णांना त्र्यंबकेश्वरमध्ये आणण्यात गैरसोय निर्माण झाली आहे. दळणवळण बंद झाल्याने या सर्व गावातील ग्रामस्थांनी आक्रमक होत त्र्यंबकेश्वर-जव्हार रस्त्यावरील आंबोली फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. हा रस्ता जव्हार, पालघर, मोखाडाकडे जात असल्याने प्रवासी आणि शालेय विद्यार्थी यांची आंदोलनामुळे गैरसोय झाली. त्र्यंबकेश्वर पोलिसांसह प्रशासकीय अधिकारी आंदोलनस्थळी आले. तहसीलदार, उपअभियंता यांनी ग्रामस्थांशी त्यांच्या मागण्यांविषयी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करण्यात आला.
दरम्यान, अधिकाऱ्यांना रस्ता दुरूस्त कधी होणार, असा प्रश्न यावेळी आंदोलकांकडून विचारण्यात आला. पुढील पंधरा दिवसात रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. तसेच ठेकेदारांनी रस्त्यांची निकृष्ट कामे केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा, पावसात रस्ते खराब असल्याने विद्यार्थी तसेच प्रवासी वाहतुकीस अडचणी येत असल्याने पर्यायी मार्ग तयार करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रस्त्यांची वाट लागली आहे. खड्डेमय रस्त्याने वाहन चालवितांना चालकांना कसरत करावी लागत आहे. त्र्यंबकेश्वर-जव्हार, पालघर या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी कित्येकदा करुनही प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी रास्ता रोको केला. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.