नाशिक – नाशिक येथे चौथ्या विश्व मराठी संमेलनास मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कविवर्य कुसुमाग्रज नगरीत शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. संमेलनाच्या उदघाटनाआधी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून शोभायात्रा काढण्यात आली. नाशिक नगरी या संमेलनामुळे मराठीमय झाली असून विश्व मराठी संमेलनात शुक्रवारपासून रविवारपर्यंत तीन दिवस परिसंवाद, व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. याशिवाय वेगवेगळ्या विषयांवरील ३३ दालने असल्याने रसिकांना काय, काय पाहावे, असा प्रश्न पडणार आहे.
शुक्रवारी दुपारी तीन वाजता कविवर्य कुसुमाग्रज नगरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्यासह जिल्ह्यातील मंत्री, आमदार, महापौर उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन सत्रात डॉ. भालचंद्र नेमाडे यांना साहित्य भूषण, श्रीनिवास कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवनगौरव, तर मारुतीबाबा कुरेकर यांना विश्व मराठी संमलेनाच्या विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. शनिवारी विविध परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतील. रविवारी व्याख्यान,कवी संमेलन, परिसंवाद आणि सायंकाळी पाच वाजता राज्यपाल आचार्य देवव्रत, प्रा. राम शिंदे, राहुल नार्वेकर, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत आदींच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.
संमेलनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयार्फत दरमहा प्रकाशित करण्यात येत असलेल्या व महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साक्षीदार असलेल्या लोकराज्य मासिकासह विविध विभागांची दालने नागरिकांना माहिती देण्यासाठी सज्ज झाली आहेत. एकूण ३३ विषयांवरील दालने या प्रांगणात सजली आहेत. या दालनांच्या माध्यमातून राज्याचा इतिहास, भाषा, संस्कृती, साहित्य, विज्ञान, कृषी, सामाजिक विकास, कौशल्यविकास आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. सर्व नागरिक, लेखक, कवी, साहित्यप्रेमी, संशोधक, विद्यार्थी व पर्यटकांनी या दालनांना अवश्य भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
संमेलनस्थळी उभारण्यात आलेल्या प्रमुख दालनांमध्ये ऐतिहासिक वारसा स्थळे, पुराभिलेखागारातील मराठी, मुद्रण-प्रकाशन, ग्रंथालय विश्व, संवाद माध्यमे, संस्थात्मक साहाय्य, संस्कृती, दादासाहेब फाळके चित्रनगरी, महासंस्कृती, हिरकणी, खाद्यसंस्कृती, हस्तकला, बोलीभाषा, पर्यटन, कृषी, पशुसंवर्धन व कृषी पूरक उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान व मूलभूत विज्ञान, वस्त्रोद्योग, तंत्रशिक्षण, तंत्रज्ञान व मराठी भाषा, आदिवासी विकास विभाग, कौशल्य ते करिअर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय या दालनांचा समावेश आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयार्फत प्रकाशित केले जाणारे महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र, महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साक्षीदार असलेल्या लोकराज्य मासिकाचे दालन जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक यांच्यामार्फत संमेलनस्थळी उभारण्यात आले आहे. या दालनामध्ये लोकराज्य मासिकाचे सन १९६४ पासूनचे दुर्मिळ, विशेष अंक ठेवण्यात आले असून वाचकांना हे अंक पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी या दालनास भेट देण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.

