नाशिक – मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अर्थात एसआरआर मोहिमेत जिल्ह्यातील १० लाख २७ हजार ८९४ मतदारांची नावे यादीतून वगळली गेली असली तरी या अनुषंगाने आतापर्यंत कुठलीही हरकत वा तक्रार नोंदवली गेलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली मतदार यादीचा आढावा व सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी आमदार सीमा हिरे, नितीन पवार, हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर्व मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघात १० लाख २७ हजारहून अधिक मतदारांची नावे विविध कारणास्तव वगळली गेली आहेत. यामध्ये सर्वाधिक नावे नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व आणि देवळाली या चार शहरी विधानसभा मतदारसंघांमधून वगळण्यात आली आहेत. केवळ याच चार मतदारसंघांमधून एकत्रितपणे ५.५ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. ज्यांची नावे यादीतून वगळली गेली, त्यांच्या हरकती वा तक्रारी आलेल्या नसल्याची माहिती राजकीय पक्षांसमोर मांडण्यात आली.

संबंधितांनी बूथ स्तरावरील एजंट (बीएलए) नियुक्त करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून कोणताही पात्र मतदार या प्रक्रियेतून वंचित राहणार नाही.निवडणूक यंत्रणेने शहरी भागावर लक्ष केंंद्रीत केले आहे. काही राजकीय प्रतिनिधींनी या मोहिमेत बीएलओ यांनी घरी भेट देऊन गणना प्रपत्र भरून घेणे आवश्यक असताना ते घरी गेले नसल्याच्या तक्रारी केल्या. या संदर्भात संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे डॉ. गेडाम यांनी सूचित केली.

मतदार नोंदणीसाठी विशेष शिबीर

जिल्ह्यातील पात्र मतदारांनी आणि गोळा करता न आलेल्या वर्गवारीतील नागरिकांनी ३० सप्टेंबरपर्यत संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे आपले दावे, हरकती दाखल कराव्यात. ज्यांची नावे प्रारूप यादीतून वगळली गेली आहेत, ते हरकत घेऊ शकतात. तसेच त्यांना नव्याने अर्ज क्रमांक सहा भरण्याचाही पर्याय असल्याचे सांगण्यात आले. एक ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांक वा त्यापूर्वी १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनी नमूना अर्ज सहा भरून आपले नाव मतदार यादीत नोंदवावे. यासाठी १९, २० आणि २६, २७ सप्टेंबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे.

निष्काळजीपणा आढळल्यास कारवाई

मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामात प्रत्यक्ष क्षेत्रीय पातळीवर काम करणाऱ्या बीएलओंकडून होणाऱ्या कामाचा नियमित आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना द्याव्यात. पात्र मतदाराचे नाव कोणत्याही परिस्थितीत चुकीने वगळले जाणार नाही, याची दक्षता घेत दावे व हरकतींची नियमानुसार काटेकोर छाननी करावी. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व नागरिकाभिमुख पद्धतीने राबवावी. कामात जाणीवपूर्वक दिरंगाई अथवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, असे निर्देशही विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी दिले.