नाशिक – मतदार विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) पहिल्या टप्प्यातील घरोघरी सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. आता एसआयआरच्या पुढील टप्प्यात प्रारूप मतदार यादी, हरकती-सुनावणी आणि त्यानंतरच्या कार्यवाहीचे काटेकोर नियोजन करावे. तसेच अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार नोंद असलेल्या मतदारांबाबत गैरसमज निर्माण होणार नाहीत, याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले.
नाशिक विभागातील एसआयआरच्या कामाचा आढावा घेण्यासाठी येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत चोक्कलिंगम यांनी मार्गदर्शन केले. पहिल्या टप्प्यात संबंधित मतदार प्रत्यक्ष त्या ठिकाणी वास्तव्यास आहे किंवा नाही, याची पडताळणी करण्यात आली. ‘एन्यूमरेशन फॉर्म’ तसेच उपलब्ध निवडणूक नोंदींच्या आधारे मतदार नोंदींची तपासणी करण्यात आली.
एसआयआरचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दुसऱ्या टप्प्यात ‘इलेक्ट्रॉनिक रोल प्रिंट’चे काम त्वरित पूर्ण करावे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना अचूक माहिती द्यावी. मतदार यादीतून नाव वगळलेल्या मतदारांचे काही आक्षेप असल्यास त्याचे निराकरण करावे. मतदाराचे नाव वगळलेल्यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर नमुना क्रमांक सहा भरून देण्याबाबत अवगत करावे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नोटीस बजावणी, कागदपत्रांचे संकलन आणि प्राथमिक पडताळणीसाठी योग्य पद्धतीचा अवलंब करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
बैठकीत विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील एसआयआरच्या कामाची सद्यस्थिती सादर केली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी (नाशिक) आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी (धुळे) भाग्यश्री विसपुते, जिल्हाधिकारी (अहिल्यानगर) डॉ. पंकज आशिया, जिल्हाधिकारी (जळगाव) रोहन घुगे, जिल्हाधिकारी (नंदुरबार) डॉ. मित्ताली सेठी, तसेच नाशिक विभागातील सर्व उपजिल्हा निवडणूक अधिकारी आणि मतदान नोंदणी अधिकारी उपस्थित होते.
वगळलेल्या मतदारांना डिजिटल नोटीस
यादीतून वगळलेल्या मतदारांच्या आक्षेपांच्या अनुषंगाने त्यांना नोटीस बजावताना डिजिटल व्यासपीठाचा वापर करावा आणि सुनावणी घेऊन योग्य ती कार्यवाही करावी. मतदारांच्या शंका आणि आक्षेपांना तत्काळ प्रतिसाद द्यावा, जेणेकरून या प्रक्रियेविषयी गैरसमज पसरणार नाहीत. राजकीय प्रतिनिधी तसेच लोकप्रतिनिधींच्या बैठका घ्याव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या.
विशेष दक्षतेची सूचना
प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीनंतर मृत, स्थलांतरित आणि दुबार मतदारांच्या यादीबाबत तसेच एसआयआर प्रक्रियेबाबत जनजागृती करावी. हरकती आणि सुनावणी प्रक्रियेबाबत स्पष्ट माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार नोंद असलेल्या मतदारांबाबत गैरसमज निर्माण होणार नाहीत, याची विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचना चोक्कलिंगम यांनी दिल्या.
