नाशिक – दुष्काळाच्या सावटात महानगरपालिकेने शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी केलेल्या मागणीत लोकसंख्येच्या निकषानुसार सुमारे १०५० दशलक्ष घनफूट पाण्याची कपात करण्यात आली आहे. २०२६-२७ या वर्षासाठी महापालिकेच्या ६,३१७ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणास मान्यता देण्यात आली. या पार्श्वभूमीवर, दिवाळीनंतर शहरात १० टक्के पाणीकपात लागू करण्याचे नियोजन करणे महापालिकेला क्रमप्राप्त ठरले आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र ६३५ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणास मान्यता देण्यात आली आहे.

जलसंपदामंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात २०२६-२७ या वर्षासाठी पाटबंधारे प्रकल्पांतील पिण्याच्या पाण्याच्या आकस्मिक व प्रासंगिक आरक्षणाबाबत बैठक पार पडली. महापालिकेने गंगापूर धरण समूहातून ५,४४०, दारणा धरणातून २३० आणि मुकणे धरणातून १,७०० असे एकूण ७,३७० दशलक्ष घनफूट पाणी, तसेच कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र ६३५ दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी केली होती. अशा प्रकारे एकूण ८,००५ दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी करण्यात आली होती.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निकषांनुसार, पाटबंधारे विभागाने बाष्पीभवनासह नाशिक शहरासाठी ६,३१७ दशलक्ष घनफूट आणि कुंभमेळ्यासाठी मागणीनुसार ६३५ दशलक्ष घनफूट, असे एकूण ६,९५२ दशलक्ष घनफूट पाणी देता येईल, असे स्पष्ट केले. या निकषांनुसार नाशिक शहराच्या पाणी आरक्षणास मान्यता देण्यात आली. यामुळे महापालिकेने केलेल्या मागणीच्या तुलनेत शहरासाठी १,०५३ दशलक्ष घनफूट कमी पाणी उपलब्ध होईल.

शासनाच्या निर्देशानुसार शहरात आतापर्यंत १० % कपात करण्यात आलेली नाही. अपेक्षित  पाणी आरक्षण न झाल्यामुळे महापालिकेला वितरण व्यवस्था, दैनंदिन वापर आणि संभाव्य पाणीटंचाई यांचा विचार करून नव्याने नियोजन करावे लागणार आहे. त्यासाठी दिवाळीनंतर १० टक्के पाणीकपात करण्याचा पर्याय पुढे आला आहे. बैठकीत महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी शहराच्या पाणीपुरवठ्याची माहिती दिली.

अवैध उपसा रोखा

एल निनोच्या प्रभावामुळे धरणांतील पाण्याचे बाष्पीभवन अधिक होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे उपलब्ध जलसाठ्याचा वापर जपून करणे आवश्यक असल्याचे मंत्री महाजन यांनी सूचित केले. पाण्याचा अवैध उपसा रोखावा आणि पाणी उपसणारे विद्युतपंप बंद ठेवण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना करण्यात आल्या.