नाशिक – जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर टंचाई काळात ग्रामीण भागातील नागरिकांना आणि जनावरांना पिण्याचे पाणी आणि चारा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने व तत्परतेने कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिले.

जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कामकाजाचा तसेच टंचाई परिस्थितीचा सविस्तर आढावा बैठक पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीत जिल्ह्यातील पर्जन्यमान, धरणांतील पाणीसाठा तसेच भूजल पातळी यांचा आढावा घेण्यात आला. काही तालुक्यांत पर्जन्यमान समाधानकारक असले, तरी काही भागांत अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने तेथे पाणी टंचाईची शक्यता लक्षात घेऊन आगाऊ उपाययोजना कराव्यात, अशी सूचना करण्यात आली. सध्या टंचाईग्रस्त भागात आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

टंचाई कृती आराखड्याचा आढावा घेताना गेल्या वर्षीच्या अनुभवाचा विचार करून यावर्षी अधिक काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. टंचाईच्या काळात कमी वेळेत प्रभावी उपाययोजना राबविता याव्यात, यासाठी तालुकास्तरावरील यंत्रणेने पूर्वतयारी पूर्ण ठेवावी, असेही पवार यांनी स्पष्ट केले. जल जीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनांच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला, प्रलंबित योजना विहित कालावधीत पूर्ण करून लाभार्थ्यांपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी कामांना गती देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या. ज्या तालुक्यांत कामांची प्रगती तुलनेने कमी आहे, तेथे विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आले.

टंचाईची शक्यता असलेल्या भागांत पशुधनासाठी चारा व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तपासून त्याचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना पवार यांनी पशुसंवर्धन विभागास दिल्या. तालुकानिहाय पशुधनाची स्थिती, चाऱ्याची मागणी व उपलब्ध साठा यांचा आढावा घेऊन गरजेनुसार चारा वितरणाची पूर्वतयारी ठेवावी, तसेच लसीकरण, आरोग्य तपासणी व औषधसाठ्याची कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे त्यांनी सांगितले. जनावरांच्या पाण्याची सोय करताना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाशी समन्वय राखण्याचेही निर्देश देण्यात आले.

टंचाई परिस्थितीला तोंड देरण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज असून नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घेतली जाईल, असे या वेळी सांगण्यात आले. पशुसंवर्धन विभागाचे उपआयुक्त डॉ. सदाशिव बेंडकुळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र महाजन, उपअभियंता प्रतिक्षा नेरकर आदी अधिकारी उपस्थित होते.