नाशिक – शहर परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठल्याने शहरातील बहुतांश भागात अप्रत्यक्षरित्या पाणीकपात सुरू झाल्याने स्थानिकांना कृत्रीम टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

नाशिक शहराला मुकणे, गंगापूर धरणातून पाणी पुरवठा होतो. आगामी कुंभमेळा तसेच शहराची वाढती लोकसंख्या, पाण्याची गरज लक्षात घेता ठिकठिकाणी नवीन जलवाहिनी टाकणे तसेच विकास कामांना सुरूवात झाली आहे. या दुरूस्तीच्या कामामुळे काही ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागल्याने परिसरातील पाण्याच्या टाक्या या पूर्ण क्षमतेने भरल्या जात नाहीत. परिणामी अनेक ठिकाणी कमी दाबाने, कमी वेळ, अपुऱ्या स्वरूपात पाणी पुरवठा होत आहे. काही दिवसांपूर्वी सिडको विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शिंदे गटाच्या नगरसेविका कविता नाईक यांनी परिसरातील महिलांना एकत्र करत हंडा आंदोलन केले होते. प्रभाग क्रमांक ३१ मध्येही पंधरा दिवसांहून अधिक काळापासून अपुऱ्या स्वरूपात पाणी पुरवठा होत आहे.

याविषयी पाथर्डी गावातील सुखदेव नगर येथील रहिवासी रमेश जगताप यांनी समस्या मांडली. सुखदेव नगरात अर्ध्या भागात नियमित पाणी येत आहे तर अर्ध्या भागात कमी दाबाने पाणी येते. पिण्याचे पाणी जेमतेम भरले जाते. नगरसेवक तसेच महापालिका यांच्याकडे तक्रार करूनही प्रशासन ढिम्म आहे. ज्ञानेश्वर नगर परिसरात टंचाईला वैतागून इमारतीतील लोकांना एक दिवसाआड टँकर मागवावा लागत आहे. एका टँकरसाठी १८०० रुपये पडतात. यामुळे रहिवाशांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. पाणी पट्टीचे देयक द्यावे लागेल ते वेगळेच. स्थानिकांच्या तक्रारींमुळे नगरसेवकही वैतागले आहेत. पाण्याच्या वेळा चुकल्या की नगरसेवकांचे भ्रमणध्वनी खणाणू लागतात. त्यामुळे अनेक नगरसेवक त्या काळात फोन बंद ठेवतात. अथवा फोन उचलतच नाहीत.. त्यांच्या संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांशिवाय कोणी नाही, असे चित्र असून काही नगरसेवक महापालिका पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या दालनात तळ ठोकून असतात.

याविषयी नगरसेविका बाळकृष्ण शिरसाठ यांनी समस्या मांडली. सिडको परिसराला मुकणे धरणातुन पाणी पुरवठा होतो. हे पाणी नाशिक पूर्वमधील काही प्रभागांकडे वळवले आहे. तसेच धरणात कमी पाणी साठा आहे. अनेक ठिकाणी मोठ्या क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या, जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू असल्याने नागरिकांना पुढील सहा महिने टंचाईचा सामना करावा लागणार नाही. नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन शिरसाठ यांनी केले.