नाशिक – एप्रिलच्या प्रारंभापासून जिल्ह्याच्या काही भागात टंचाई जाणवण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे स्थानिकांचे स्थलांतर होऊ लागले असून काही जण मात्र परिस्थितीला तोंड देत गावातच थांबून आहेत. सुरगाणा तालुक्यातील सालभोये हे गाव त्यापैकीच एक.
नाशिक हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मागील वर्षी मे महिन्यापासूनच पावसाळ्याला सुरुवात झाली होती. त्यामुळे यंदा पाण्याचे दुर्भिक्ष्य फारसे जाणवणार नाही, अशी अपेक्षा होती.

मात्र ग्रामीण भागात विशेषत: आदिवासीबहुल परिसरात मार्चपासूनच पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली. उन्हाच्या वाढत्या तडाख्याने गाव-पाडा परिसरातील नैसर्गिक स्त्रोत आटत आहेत. गावाच्या आजुबाजुला असलेल्या विहीर, झरे यातून ग्रामस्थ पाणी आणत आहेत. आदिवासीबहुल भागात टंचाईचा प्रश्न बिकट झाला आहे. पेठ, सुरगाणा, त्र्यंबक , इगतपुरी या तालुक्यांमधील काही भागात पाणी टंचाई जाणवत आहे.

महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सुरगाणा तालुक्यातील सालभोये गावाची लोकसंख्या ७०० हून अधिक आहे. गाव पूर्णपणे शेतीवर अवलंबून असले तरी उन्हाळ्यात गावात पाणी मिळत नसल्यानेने अनेक जण गुजरात, नाशिक, पिंपळगाव, निफाड आदी ठिकाणी स्थलांतरीत होतात. यंदाही गावातील दोन विहिरी आटल्या आहेत. मागील वर्षी टंचाईवर पर्याय म्हणून ग्रामपंचायतीने पाण्याचा टँकर विहिरीत ओतत समस्या काहीअंशी सोडवली होती.

यंदा मार्चअखेरीस गावातील दोन विहिरींमधील पाणी आटल्याने गावापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीवर, आश्रमशाळेत उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यावर तहान भागवली जात आहे. या माध्यमातून घरटी तीन ते चार हंडे पाणी मिळते. परंतु, दोन विहिरी आटल्याने एकाच विहिरीवर गावाची तहान भागविण्याचा भार येत आहे. गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन टाकण्यात आली असली तरी दोन वर्ष होऊनही पाणी नाही, अशी स्थिती आहे.

याविषयी मनोहर भोये यांनी, आमच्या दोनपेक्षा अधिक पिढ्या पिण्याच्या पाण्यासाठी उन्हात भटकंती करीत असल्याचे सांगितले.. लग्नसराईत एका टँकरसाठी दीड हजारांहून अधिक पैसे लागतात. महिलांना दूरवरुन पिण्याचे पाणी आणतांना त्यांची दमछाक होते. सध्या ज्या विहिरीतून पाणी आणले जात आहे, ते पिण्यासाठी योग्य आहे की नाही, यापेक्षा ते पाणी आहे हे महत्वाचे आहे. त्याची स्वच्छता मुद्दा गौण ठरतो. याविषयी शासनाकडे निवेदने दिली, पत्रव्यवहार केला. परंतु, टंचाईचा तिढा आजही सुटलेला नाही, असे भोये यांनी नमूद केले.