नाशिक – पतीच्या निधनानंतर लादल्या जाणाऱ्या अमानवी, अवैज्ञानिक व अन्यायकारक प्रथा नाकारत स्त्रीसन्मान, समानता व मानवी हक्कांचे मूल्य अधोरेखित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने ‘सौभाग्याचं शपथपत्र’ हा अभिनव उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. ‘नवचेतना अभियान’ अंतर्गत हे शपथपत्र भरून घेण्यात येत आहे. पतीच्या निधनानंतर मंगळसूत्र काढणे, कुंकू पुसणे, जोडवे काढणे, विशिष्ट रंग व वस्त्रांवरील निर्बंध तसेच सामाजिक व धार्मिक बंधने या सर्व प्रथा अन्यायकारक असून न पाळण्याचा निर्धार करण्यात येत आहे.
नाशिक तालुक्यातील चांदशी ग्रामपंचायत अंतर्गत विविध धर्मीय २० जोडप्यांनी स्वेच्छेने ‘सौभाग्याचं शपथपत्र’ स्वीकारत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिलांच्या आत्मसन्मानाला बाधा आणणाऱ्या रूढी, परंपरा आणि कूप्रथा यांना ठामपणे नकार देणे, भारतीय संविधानातील स्त्री-पुरुष समानता मूल्यांचा स्वीकार करणे हा आहे. महात्मा जोतिराव फुले आणि लोकहितवादी गोपाळ गणेश आगरकर यांच्या प्रबोधनपर विचारधारेतून प्रेरणा घेत स्त्रीसमानता, विवेकवाद व सामाजिक न्याय यांवर आधारित ही शपथ आहे. शपथपत्राद्वारे दाम्पत्यांनी महिलांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा सन्मान राखण्याची, महिलेला दुय्यम ठरवणाऱ्या कूप्रथांना कोणतेही समर्थन न देण्याची तसेच कुटुंब, गाव व समाजपातळीवर जनजागृती करण्याची जबाबदारी स्वीकारली. हा उपक्रम केवळ औपचारिक न राहता प्रत्यक्ष आचरणात व कृतीत उतरविण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला.
कोणत्याही पतीला मंगळसूत्र तोडणे, कुंकू पुसणे यासारख्या गोष्टी आवडणार नाहीत, या भावनेतून ग्रामपंचायत अधिकारी विनोद अहिरे आणि त्यांची पत्नी राजश्री अहिरे यांनी ‘सौभाग्याचं शपथपत्र’ स्वीकारत समाजासमोर आदर्श ठेवला. विनोद अहिरे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांची भेट घेऊन अभिनव उपक्रमाची माहिती दिली, याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी अहिरे दाम्पत्याचे अभिनंदन केले, यावेळी ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ उपस्थित होत्या.
विशेष म्हणजे, या उपक्रमात विविध धर्मीय नागरिकांनी सहभाग घेतला, त्यामुळे हा उपक्रम सर्वसमावेशक सामाजिक सुधारणेचा संदेश देणारा ठरला. स्त्रीसन्मान आणि मानवी मूल्ये ही कोणत्याही एका धर्माची अथवा समूहाची नसून ती सार्वत्रिक आहेत, हा सकारात्मक संदेश या माध्यमातून समाजात पोहोचला.
‘नवचेतना अभियान’ अंतर्गत राबविण्यात येणारे असे उपक्रम महिलांच्या सक्षमीकरणाला बळ देणारे असून समाजातील विचारप्रवाह बदलण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. सिन्नर मधील गुळवंच व नाशिक मधील चांदशी ग्रामपंचायतीतील ‘सौभाग्याचं शपथपत्र’ उपक्रम हा सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असून, भविष्यात इतर ग्रामपंचायतींनीही अशा उपक्रमांचे अनुकरण करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या अभिनव उपक्रमांतर्गत सिन्नर तालुक्यातील गुळवंच ग्रामपंचायतीने जनजागृती सुरू केली असुन माध्यमिक विद्यालय गुळवंच येथील २६७ विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांकडून ‘सौभाग्याचं शपथपत्र’ भरून आणत या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.
महिलांच्या आत्मसन्मानाला बाधा आणणाऱ्या कूप्रथांना नकार देणे, ही काळाची गरज आहे. सौभाग्याचे शपथपत्र उपक्रमातून समाजात स्त्री-पुरुष समानतेची जाणीव निर्माण होत असून हा बदल प्रत्येक कुटुंबातून स्वेच्छेने व्हायला हवा -ओमकार पवार (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक)
