नाशिक – न्यूक्लिया, किंग, गाउडी, मिडिव्हल पंडित्झ ही नावे सर्वसामान्यांना माहीत असण्याचे कारण नाही. ही नावे नेमकी कोणाची, या नावांची चर्चा नाशिकमध्ये होण्याचे कारण काय, या नावांचा नाशिकमध्ये होणाऱ्या ‘सुला फेस्ट’ शी संबंध काय, असे प्रश्न अनेकांना पडले असतील. या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी अवघे काही तास थांबावे लागणार आहे.

द्राक्षांपासून तयार करण्यात येणाऱ्या वाइनमुळे नाशिकची ओळख सातासमुद्रापार पोहचली आहे. त्यामुळे देशाची वाइन कॅपिटल म्हणूनही ओळख निर्माण झाली आहे. नाशिक हा द्राक्षांचा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे. नाशिक जिल्ह्यातील वाइनरीज आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन दरवर्षी करीत असतात. त्यात सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रसिध्द असा सुला वाइनयार्डसचा ‘सुला फेस्ट’ आहे. २०२६ वर्षाच्या सुला फेस्टमध्ये कोणते कलाकार आपली कला सादर करणार आहेत, याविषयी संगीतप्रेमी आणि वाइनप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

सुला फेस्टला अवघे काही तास उरले आहेत. यानिमित्त नाशिकमध्ये येणाऱ्या पर्यटकांमुळे कोट्यवधींची उलाढाल शक्य आहे. सुला फेस्टला दरवर्षी देश, विदेशातील हजारो पर्यटक येत असतात. यंदा ३१ जानेवारी आणि एक फेब्रुवारी रोजी नाशिकमधील निसर्गरम्य सुला वाइनयार्डमधील ॲम्फिथिएटर येथे दोन दिवसीय संगीत आणि संस्कृतीचा अनोखा संगम असलेला सुला फेस्ट अनुभवता येणार आहे. सुला फेस्टचे दोन दिवस नाशिकमधील हाॅटेल आणि पर्यटन व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावरील उलाढालीचे असतात. देशात आणि राज्यात वाइन उत्पादनात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. त्यातही नाशिक जिल्ह्याने वाइन निर्मितीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. नाशिकच्या सुला वाइनयार्डसकडून सातत्याने वाइनचे नवीन प्रकार बाजारात आणण्याचा प्रयत्न केला जातो. केवळ वाइन निर्मिती न करता संगीतप्रेमींना आकर्षित करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील गायक, संगीतकारांची कला पाहण्याची संधी नाशिकमध्ये सुला वाइनयार्डसतर्फे दरवर्षी उपलब्ध करुन दिली जाते.

नाशिक जिल्ह्यात वाइन संदर्भातील महोत्सवाची सुरुवातही सुला वाइनयार्डसनेच केली आहे. नाशिक शहरापासून जवळच असलेल्या गंगापूर धरणालगत ‘सुला वाईनयार्डस’ आहे. या ठिकाणी दररोज असंख्य पर्यटक वाइनची चव चाखण्यास आणि खाद्यपदार्थांचा आनंद लुटण्यास येत असतात. सुलाच्या रिसॉर्टमध्ये निवासाचीही व्यवस्था आहे. दरवर्षी होणाऱ्या ‘सुलाफेस्ट’ मध्ये वाइन आणि संगीताचा संगम पाहण्यास मिळतो. उद्योजक राजीव सामंत यांनी १९९६ मध्ये सुलाची स्थापना केली. सुला वाईनची आज आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वत्र ओळख झाली आहे. राजीव सामंत यांनी २००८ मध्ये वाइन घेता घेता संगीताचा आनंदही लोकांना घेता यावा, यासाठी सुला फेस्ट सुरु केले.

आशियातील सर्वात लोकप्रिय वाईनयार्ड संगीत महोत्सव सुलाफेस्ट २०२६ मध्ये आपल्या १५ व्या पर्वासह परतत आहे. ३१ जानेवारी आणि एक फेब्रुवारी रोजी नाशिकमधील निसर्गरम्य सुला वाइनयार्डमध्ये सुला फेस्ट होत आहे. सुला फेस्ट २०२६ मध्ये विविध संगीत प्रकारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कलाकारांचा उत्साही संगम पाहण्यास मिळणार आहे. यंदाच्या पर्वात न्यूक्लिया, किंग, गाउडी, मिडिव्हल पंडित्झ (कर्ष काले आणि कुतले खान यांच्यासह), द यलो डायरी, स्वरात्मा, प्रिन्सली, स्टेटस डब ऑर्केस्ट्रा, डैरा (क्विनडमसह), डार्क सर्कल फॅक्टरी, डाॅट, ओजी शेज आणि शुगहनी हे कलाकार आपली कला सादर करणार आहेत. संगीताबरोबर उपस्थितांना निवडक खाद्यपदार्थ, सुलाच्या पुरस्कारप्राप्त वाइन, वाइन काॅकटेल्स आणि वाइन कॅन्सचा आस्वाद घेता येईल. द सोर्स शार्दोने रिझर्व्ह, सुला मस्कत ब्लाॅ, सुला मर्लो यांसह सुलाच्या नव्या वाइन लाँचेसचा अनुभव घेण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे.

सुलाफेस्टनिमित्ताने नाशिकमधील ८५ टक्के हाॅटेल्समधील खोल्या बुक झाल्या आहेत. मुंबई विमानतळ ते नाशिक आणि नाशिक ते मुंबई विमानतळ या प्रवासासाठी कार बुकिंगमध्येही वाढ झाली आहे. एकूणच सुलाफेस्ट नाशिकमध्ये मोठी आर्थिक उलाढाल करणारा ठरणार आहे.