नाशिक – नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या (एनडीसीए) वतीने नाशिकमधील महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना व्यावसायिक स्तरावर खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक वूमेन प्रिमियर लीग (एडब्लूपीएल) स्पर्धा आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अशा स्पर्धेतूनच उद्याची स्मृती मानधना, हरमनप्रित कौर देशाला मिळू शकेल.

नाशिकमधील महिला क्रिकेटच्या विकासासाठी नाशिक वूमेन प्रिमियर लीग हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात सुमारे १५० महिला क्रिकेटपटू सक्रियपणे क्रिकेट खेळत आहेत. या खेळाडूंना स्पर्धात्मक अनुभव, व्यावसायिक वातावरण आणि मोठ्या स्तरावर खेळण्याची संधी मिळावी, या उद्देशाने नाशिक महिला प्रीमियर लीग आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेत पाच फ्रँचायझी संघ सहभागी होतील. स्पर्धा लीग पद्धतीने खेळवण्यात येणार असून त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामना होईल. संपूर्ण स्पर्धेत एकूण १३ सामने खेळवले जातील.

या खेळाडूंमध्ये ईश्वरी सावकार, तेजस्विनी बाटवाल, शाल्मली क्षत्रिय, रसिका शिंदे, ऐश्वर्या वाघ, प्रियंका घोडके, लक्ष्मी यादव, प्रचिती भवर, कार्तिकी गायकवाड आणि मधुरा दायमा या खेळाडूंनी विविध वयोगटातील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने आयोजित स्पर्धांमध्ये महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे प्रतिनिधित्व केले आहे. स्पर्धेतील खेळाडूंची निवड लिलाव पद्धतीने करण्यात येणार असून प्रत्येक संघासाठी अधिकृत जर्सी असणार आहे. तसेच स्पर्धेपूर्वी ट्रॉफी अनावरण सोहळा, खेळाडू लिलाव कार्यक्रम, भव्य उद्घाटन समारंभ आणि समारोप समारंभ आयोजित करण्यात येणार आहेत.

स्पर्धेसाठी २८ मार्च रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर निवड चाचणी होणार आहे. या चाचणीत फक्त नाशिक जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होऊ शकतील. ११ एप्रिल रोजी सहभागी संघांचे आयकॉन खेळाडू निवड होईल. १२ एप्रिल रोजी खेळाडू लिलाव प्रक्रिया पार पडेल. २५ एप्रिल ते एक मे या कालावधीत स्पर्धेतील सामने हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होतील.

या स्पर्धेच्या माध्यमातून नाशिक जिल्हा स्तरावर महिला क्रिकेटचा विकास करणे, खेळाडूंना संरचित व्यासपीठ उपलब्ध करून देणे, महाराष्ट्र संघासाठी खेळाडू तयार करणे तसेच महिला क्रिकेटला समाजात अधिक प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट आहे. नाशिक महिला प्रीमियर लीगमुळे जिल्ह्यातील महिला क्रिकेटपटूंना जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग उपलब्ध होणार असून नाशिक शहराची क्रीडा क्षेत्रातील ओळख अधिक मजबूत होणार आहे.

नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेने गेल्या आठ वर्षांपासून नाशिक प्रिमियर लीग (पुरुष) यशस्वीपणे आयोजित केली आहे. त्याच धर्तीवर महिला क्रिकेटमध्येही अशीच संधी निर्माण करण्याचा असोसिएशनचा प्रयत्न आहे.