नाशिक – किडनीच्या विकाराने त्रस्त झालेल्या रुग्णांचा विकार अधिक बळावला की, त्यांना डायलिसीसशिवाय पर्याय नसतो. कोणत्याही खासगी रुग्णालयांमध्ये डायलिसीस सुविधा अधिक खर्चिक असते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सामान्य परिस्थिती असलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन डायलिसीस सुविधा घेणे परवडत नाही. प्रामुख्याने ग्रामीण भागात अशी परिस्थिती दिसते. अनेक रुग्ण डायलिसीस सुविधेकडे दुर्लक्ष करतात. ही सुविधाच घेत नाहीत. परिणामी, विकार अधिक बळावत जाऊन प्रसंगी मृत्यूही ओढावतो. नाशिक जिल्ह्यातील अशा रुग्णांना एक आनंदाची बातमी आहे.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून राज्य शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मोफत डायलिसीस सुविधा लवकरच येवला उपजिल्हा रुग्णालयात सुरु करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या वतीने येवला उपजिल्हा रुग्णालयात स्वंतंत्र डायलिसीस कक्ष निर्माण करण्यात येत असून यामध्ये सात डायलिसीस खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निर्णयामुळे रुग्णांना मोठा फायदा होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने, भारत सरकारचा उपक्रम असलेल्या मे. एचएलएल लाईफ केअर लिमिटेड यांच्या मार्फत ही डायलिसीस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अंतर्गत मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यातून येवला उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज स्वतंत्र डायलिसीस कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षाच्या पायाभूत सुविधेचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच डायलिसिस कक्षाचा शुभारंभ केला जाणार आहे.
या कक्षामध्ये एकूण ७ डायलिसीस खाटांची व्यवस्था करण्यात आली असून, प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टर आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली रुग्णांना सेवा दिली जाणार आहे. अत्यावश्यक औषधे व साहित्यांसह संपूर्ण डायलिसीस प्रक्रिया मोफत उपलब्ध होणार असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे. या उपक्रमामुळे येवला आणि आसपासच्या ग्रामीण भागातील रुग्णांना नाशिक किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये जाऊन उपचार घेण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, वेळ व खर्चाची बचत होणार आहे. स्थानिक पातळीवर दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा एक महत्वपूर्ण निणर्य आहे. या निर्णयामुळे नियमित डायलिसीस करणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यासंदर्भात माजी खासदार समीर भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली आहे. येवला तालुका व परिसरातील अनेक रुग्णांना नियमित डायलिसीससाठी मोठ्या शहरांकडे जावे लागत होते. या नव्या सुविधेमुळे त्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे सामान्य नागरिकांना दिलासा देणारा हा निर्णय प्रत्यक्षात येत आहे. भविष्यातही आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासाठी अशा उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी नमूद केले.
