नाशिक – नाशिक जिल्ह्यात कित्येक शासकीय अधिकारी, कर्मचारी, शासकीय सेवक यांना लाच घेताना पकडले जात असले तरी लाच घेण्याचे प्रकार काही थांबलेले नाहीत. शासकीय सेवकांकडून सर्रासपणे लाच मागितली जाते. त्याचे त्यांना काहीच वाटेनासे झाले आहे. असाच एक प्रकार येवला तालुक्यात घडला. १५०० रुपयांची लाच स्वीकारताना एका तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.

अलीकडेच नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथे लाचखोरीचा एक प्रकार घडला. अंगणवाडी मदतनीस या पदावर नोकरी लावून देण्याच्या बदल्यात प्रारंभी २० हजार रुपयांची मागणी करुन नंतर तडजोड करुन १० हजार रुपये स्वीकारताना एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयातील संशयित पर्यवेक्षिका हेमलता गाढवे ( ५३, रा. शांतीनगर, सुरगाणा, जि. नाशिक) यांना ताब्यात घेण्यात आले होते. अंगणवाडी मदतनीस पदावर निवड करून नियुक्तीचे आदेश आपण मिळवून दिले असल्याचा दावा करुन या बदल्यात वरिष्ठांसाठी तसेच स्वतःसाठी २० हजार रुपयांची मागणी गाढवे यांनी केल्याचा संबंधित महिलेचा आरोप होता. लाचखोरीत महिलाही मागे नसल्याचे दिसत आहे.

येवला तालुक्यातील लाचखोरीचा प्रकार वेगळा आहे. ग्रामीण भागात सातबारा उताऱ्यावरील नोंद हटविणे किंवा नवीन नाव लावणे हा लाच मागण्यासाठी सर्रासपणे वापरला जाणारा मार्ग आहे. लाच न दिल्यास वेगवेगळी कारणे सांगून काम अडवून ठेवण्यात येत असल्याने अखेर नाईलाजास्तव अनेक जण तलाठ्यांना लाच देण्यास तयार होतात. परंतु, काही जण मात्र लाच मागणाऱ्या तलाठ्याला धडा शिकविण्याचा निर्धार करतात. आणि तलाठ्याला लाच घेताना बरोबर अडकवितात. येवला तालुक्यातील चिंचोडी येथील तक्रारदारानेही अशीच हिंमत दाखवत लाच मागणाऱ्या तलाठ्याला धडा शिकविला. सातबारा उताऱ्यावर कायदेशीर नोंद करण्याची संबंधिताची चिंचोडीचे तलाठी राहुल रेडे याच्याकडे मागणी होती. दर महिन्याला ६५ हजार रुपयांचा पगार घेणाऱ्या तलाठी रेडेने या कामासाठी प्रारंभी टाळाटाळ केली. नंतर दोन हजार रुपयांची मागणी केली. तडजोड केल्यानंतर १५०० रुपये दिल्यास काम करुन देण्यात येईल, असे तलाठी रेडेने सांगितले.

तलाठी रेडेने लाच मागितल्यानंतर संबंधिताने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला. विभागाने तक्रारीची पडताळणी केली. त्यात तथ्य आढळून आल्याने चिंचोडी तलाठी कार्यालयात सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे कार्यालयात संबंधिताकडून दीड हजार रुपये स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने रेडे यास रंगेहात ताब्यात घेतले. याप्रकरणी तलाठी राहुल रेडेविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी कोणीही लाच मागितल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी.