नाशिक – देशभरातून विविध स्पर्धांच्या माध्यमातून अनेक दर्जेदार युवा क्रिकेटपटू पुढे येत आहेत. बिहारचा वैभव सूर्यवंशी, मुंबईचा आयुष म्हात्रे ही प्रमुख नावे सांगता येतील. नाशिकचा १६ वर्षांआतील क्रिकेटपटू सध्या त्याच्या फिरकीने फलंदाजांना नाचवत आहे. त्याची फलंदाजीही बळकट आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) १६ वर्षांखालील विजय मर्चंट चषक क्रिकेट स्पर्धेत नाशिकच्या या गोलंदाजाने आपल्या कामगिरीमुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे. राजकोट येथे झालेल्या सामन्यात महाराष्ट्र संघातर्फे खेळताना या खेळाडूने आपल्यातील अष्टपैलुत्वाचे अफलातून दर्शन घडविले.

विजय मर्चंट स्पर्धेत महाराष्ट्राने उपविजेतेपद मिळविले. त्यात नाशिकच्या नील चंद्रात्रेची कामगिरी उल्लेखनीय ठरली. महाराष्ट्राने सौराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश विरुद्ध विजय मिळविले. हे दोन्ही सामने नाशिकच्या नील चंद्रात्रेने गाजविले. त्याची फिरकी फलंदाजांना गोंधळात टाकत आहे. आंध्र प्रदेशातील मुलापडू येथे १६ वर्षांखालील विजय मर्चंट चषक क्रिकेट स्पर्धेत एलिट गटात सौराष्ट्रविरुद्ध झालेल्या सामन्यात नील चंद्रात्रेने तीन गडी बाद केले होते. महाराष्ट्राने हा सामना १ डाव आणि ८३ धावांनी जिंकला होता. त्यानंतर हिमाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात नील चंद्रात्रेने ३४ धावा करण्यासह तीन गडी बाद केले होते.

नाशिकचा डावखुरा फिरकी गोलंदाज व उपयुक्त फलंदाज अष्टपैलु नील चंद्रात्रेने मुंबईविरुद्ध अंतिम फेरीच्या सामन्यात गोलंदाजीत पुन्हा एकदा आपल्या भेदक फिरकीचे दर्शन घडविले. डावात ५ बळी आणि फलंदाजीत महत्वपूर्ण ८५ धावा करत महाराष्ट्र संघातर्फे जोरदारअष्टपैलु कामगिरी केली. राजकोट येथे झालेल्या सामन्यात महाराष्ट्र संघातर्फे नील चंद्रात्रेने फलंदाजीत पहिल्या डावात पाचव्या क्रमांकावर खेळत ८५ धावा करून महाराष्ट्र संघाला ३८१ पर्यंत मजल मारण्यास मोठा हातभार लावला. नीलने २२३ चेंडूत ११ चौकारांसह ८५ धावा करताना महाराष्ट्राच्या डावातील ७५ षटके खेळपट्टीवर तळ ठोकला होता. शतकवीर क्षितिज येडेबरोबर त्याने चौथ्या गड्यासाठी ३ बाद १०३ वरून ४ बाद २५९ पर्यंत १५६ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. त्यानंतर गोलंदाजीत आपल्या फिरकीने मुंबईच्या फलंदाजांना नाचविले. मुंबईच्या पहिल्या डावात ४१-९-११४-५ अशी गोलंदाजीत अफलातून कामगिरी त्याने केली. मिळवले.

नीलने या विजय मर्चंट ट्रॉफी स्पर्धेत गोलंदाजीत ८ सामन्यात १४ डावात ३१ बळी घेत स्पर्धेत संपूर्ण भारतात सहावा क्रमांक मिळवला. यात त्याची एका डावात ६ बळी टिपण्याची कामगिरी सर्वोच्च होती. तर दोन डावात ५ वा अधिक बळी टिपले. नीलने षटकामागे केवळ २.२२ धावा अशा अतिशय किफायतशीर गोलंदाजीने स्पर्धेत छाप पाडली. तर फलंदाजीत देखील ८ सामन्यातील ९ डावात ३ अर्धशतकांसह ४३ .२५ च्या सरासरीने एकूण ३४६ धावा केल्या व महाराष्ट्र संघाला अंतिम फेरीत नेण्यात अतिशय उपयुक्त कामगिरी केली. मागील वर्षीही याच स्पर्धेत महाराष्ट्र संघातर्फे उपांत्यपूर्व फेरीत मध्य प्रदेश विरुद्ध दुसऱ्या डावात नीलने ५ गडी बाद केले होते. त्यावेळी त्याने विजय मर्चंट चषक स्पर्धेत तीन सामन्यात ३१ गडी बाद करुन महाराष्ट्रात सर्वोत्तम तर भारतात तिसरे स्थान मिळवले होते.

बीसीसीआयच्या राष्ट्रीय पातळीवरील या महत्वाच्या स्पर्धेत नील चंद्रात्रेने उपयुक्त अष्टपैलु कामगिरी केल्याबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा, सचिव समीर रकटे आणि इतरांनी त्याचे अभिनंदन केले आहे.