नाशिक – आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकणारच, असा विश्वास शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. पक्षातील सर्व पदे भररण्यासाठी विभागनिहाय, तालुकानिहाय, गटनिहाय बैठका घेतल्या जाणार आहेत. महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जाणार असून यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती सामंत यांनी दिली.

येथे नाशिक तसेच दिंडोरी लोकसभा मतदार संघाचा आढावा मंत्री सामंत यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी शिक्षण मंत्री दादा भुसे, संपर्क नेते आ. सुहास कांदे आदी उपस्थित होते. सामंत यांनी, स्वबळाचा नारा देणार नाही. परंतु, प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. बैठकांमधून शिवसेनेचे पदाधिकारी संपूर्ण ताकदीने काम करत असल्याचे स्पष्ट होत आहे. ग्रामीण भागात पक्ष वाढण्यासाठी काम सुरू आहे. दुसरीकडे, पक्षात किंवा महायुतीमध्ये नाराजी नाही.पक्षात कुठल्याही प्रकारची गटबाजी नाही, पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. एकसंघपणे आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. जाणीवपूर्वक जे गटबाजी करतील, त्यांची नावे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात येतील, असा इशारा सामंत यांनी दिला.

मागील निवडणुकीमधील चुका टाळण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीत आपल्यासह दादा भुसे, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, शंभुराजे देसाई यांचा समावेश असल्याचे सामंत यांनी सांगितले. कार्यकर्त्यांमध्ये कटुता राहणार नाही, यासाठी समन्वय समिती काम करीत आहे. मागील निवडणुकीतही समन्वय समिती होती. परंतु, त्यात समन्वय नव्हता. ती चुक पुन्हा होऊ नये यासाठी आम्ही काम करत आहोत, असे सामंत यांनी नमूद केले.

शक्ती कायद्यासाठी सरकार सकारात्मक असून याबाबत अहवाल राष्ट्रपतींकडे पाठवला आहे. नाशिक टीसीएसमधील प्रकरणाचा आयटी क्षेत्रावर आणि अन्य उद्योगांवर परिणाम झाला असे म्हटले जात असले तरी आयटी क्षेत्र आणि उत्पादन क्षेत्र यात मोठा फरक आहे. टीसीएस कंपनीचे परिणाम उत्पादन कंपनीवर व्हायला नको. महिंद्राच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक नाशिकमध्ये येणार आहे. यामुळे नाशिककरांना मोठा रोजगार मिळणार आहे. यामुळे सर्वांनी सकारात्मकता दाखवावी. बंद पडलेल्या कंपन्या आणि जमिनी दोन वेगवेगळे भाग आहेत. जागा विकण्याचा प्रयत्न झाला असेल तर अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा सामंत यांनी दिला.