मालेगाव : ऑनलाइन पद्धतीने नियमानुसार तालुक्याबाहेर बदल्या झालेल्या मालेगाव तालुक्यातील २७ प्राथमिक शिक्षकांना कार्यमुक्त न करण्याचा तुघलकी निर्णय नाशिक जिल्हा परिषदेने घेतला होता. त्या विरोधात शिक्षक संघटनांनी आवाज उठवल्यानंतरही त्याकडे कानाडोळा करण्याचे धोरण जिल्हा परिषद प्रशासनाने अवलंबले होते. अखेर चार महिन्यांनी आता प्रशासनाला जाग आली आहे. ३१ जानेवारीला या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश काढण्यात आला आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलीसाठी शासन निर्णयानुसार गेल्या ऑगस्ट महिन्यात ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील ३८३८ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र ही प्रक्रिया पार पडल्यावर पावणे दोन महिने उलटल्यानंतरही संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त करून बदली झालेल्या ठिकाणी हजर करून घेतले गेले नव्हते. जिल्हा परिषदेकडून होणाऱ्या या कालापव्ययामुळे शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा दिल्यावर अखेर गेल्या १५ ऑक्टोबर रोजी नाशिक जिल्हा परिषदेने बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश काढले होते.
या आदेशानुसार नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील बदली झालेले शिक्षक लगेच कार्यमुक्त होऊन नव्या शाळांमध्ये हजर झाले. परंतु मालेगाव तालुक्यामधून अन्य तालुक्यांमध्ये बदली झालेल्या २७ शिक्षकांच्या कार्यमुक्ती आदेशास लागलीच स्थगिती देण्यात आली होती. संबंधित शिक्षक असणाऱ्या शाळांवर त्यांच्या बदलीनंतर रिक्त पदे राहत असल्याने तेथे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ,नये यासाठी या शिक्षकांची कार्यमुक्ती रोखण्यात आल्याचा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला होता.
जिल्ह्यामधील अन्य १४ तालुक्यांमध्ये हा निकष न लावता केवळ मालेगाव तालुक्यातच हा निकष लावल्याने त्या विरोधात नाराजी उफाळून आली होती. या निर्णयामुळे मालेगाव तालुक्याला वेगळा न्याय का, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात होता. तसेच बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केल्यास संबंधित शाळांमधील पदे रिक्त राहतील हा जो दावा जिल्हा परिषद प्रशासनाकडून केला गेला त्याच्यात तथ्य नाही,अशी तक्रार देखील शिक्षक संघटनांकडून गावांची उदाहरणे देऊन केली गेली. मात्र प्रशासनाकडून त्याकडे साफ दुर्लक्ष केले गेल्याने शिक्षकांमध्ये नाराजी उमटली होती.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी २९ जानेवारी रोजी या सर्व २७ शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश काढले आहेत.या आदेशात ३१ जानेवारी रोजी कार्यालयीन वेळेनंतर या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधित शिक्षकांनी २ फेब्रुवारी रोजी बदली झालेल्या ठिकाणी शाळा सुरू होण्यापूर्वी हजर व्हावे, असे या आदेशात बजावण्यात आले आहे.

