नाशिक – विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्यामध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण व्हावी, तसेच प्रत्येक मूल समजपूर्वक व ओघवते वाचू शकेल या उद्देशाने नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘चला पुस्तक वाचूया : १०० दिवस वाचन चळवळ’ या उपक्रमाचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी मार्गदर्शन केले. वाचन चळवळ केवळ शिक्षण विभागापुरती मर्यादित नसून ग्रामपंचायत विभाग, महिला आणि बालविकास विभाग तसेच इतर सर्व विभागांच्या समन्वयातूनच प्रभावीपणे यशस्वी होऊ शकते. “चला, एक वाचक-स्नेही समाज घडवूया” हे ब्रीद घेऊन सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले. सर्व गटशिक्षणाधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांनी आपआपल्या तालुक्यांमध्ये या अभियानाचे नेतृत्व करावे. प्रत्येक शाळेत ‘वाचन कोपरा’ तयार करून विद्यार्थ्यांना नियमित वाचनाची संधी द्यावी, तसेच गावपातळीवर ‘चावडी वाचन’ उपक्रम प्रभावीपणे राबवावा, अशी सूचना त्यांनी केली. वाचन चळवळ जिल्ह्यात राबविण्यात येत असून ३१ मार्चपर्यंत सुरू राहील. या माध्यमातून संपूर्ण नाशिक जिल्हा ‘वाचनस्नेही जिल्हा’ म्हणून विकसित करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सरोज जगताप, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रशांत डिग्रसकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) डॉ. वर्षा फडोळ, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) प्रताप पाटील, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, दिलीप तारडे, पशुसंवर्धन उपायुक्त प्रशांत धर्माधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जगताप यांनी वाचन चळवळीची सविस्तर माहिती दिली. वाचन ही काळाची गरज आहे. जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येक मूल उत्तम वाचक व्हावे, यासाठी सर्वांनी एकजुटीने आणि प्रभावीपणे ही वाचन चळवळ राबवावी, असे आवाहन त्यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना केले. या १०० दिवसांच्या वाचन चळवळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्यात लक्षणीय सुधारणा होऊन ज्ञानसमृद्ध व वाचनसंस्कृतीने नटलेला नाशिक जिल्हा घडविण्यास निश्चितच मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवले जाते. परिपाठ वाचन होते. मात्र बऱ्याचदा वाचनात काही चुका असतात, आवाजातील चढ उतार आणि वाचन कौशल्य वृध्दींगत व्हावे यासाठी ‘चला पुस्तक वाचूया : १०० दिवस वाचन चळवळ’ या माध्यमातुन प्रयत्न करण्यात येणार आहे. वाचन म्हटले की डोळ्यांसमोर पुस्तकांची चळत येते पण ही पुस्तके अभ्यासाची आहेत. यासाठी क्युआर कोड तयार करण्यात आले असून शाळेतील शिक्षक, गावातील ज्येष्ठ लोक यांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.