नाशिक – पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत मंजूर घरकुलांची बांधकामे तसेच कामकाजाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत योजने अंतर्गत मंजुर असलेल्या घरकुलांची बांधकामे अद्याप पूर्ण नसल्याचे लक्षात आल्याने पवार यांनी ३१ डिसेंबरपर्यंत मंजुर घरकुलांचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचा इशारा दिला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत मंजूर घरकुलांचा आढावा घेतला. अद्यापही घरे मंजुर होऊन काम होऊ शकली नाही, काही अपूर्ण अवस्थेत आहेत. हे लक्षात घेता सर्व तालुक्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत मंजुर घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करावे. कोणत्याही लाभार्थ्याचा मनरेगा योजनेतील लाभ बुडणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी.
प्रत्येक ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व घरकुलांचे जिओ-टॅगिंग तातडीने पूर्ण करावे, तसेच दुसऱ्या टप्प्यातील मनरेगा योजनेच्या लाभाची माहिती नरेगा कक्षाशी समन्वय साधून अद्ययावत ठेवावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. सदर योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व तालुक्यांनी समन्वयाने काम करणे अत्यावश्यक आहे.
मनरेगा व ग्रामीण गृहनिर्माण विभाग यांच्यातील समन्वय दृढ करून, पात्र लाभार्थ्यांना लाभ वेळेत मिळेल याची दक्षता घ्यावी. घरकुल हे केवळ बांधकाम नसून ग्रामीण कुटुंबासाठी सन्मानाचे निवासस्थान आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याने हे सामाजिक बांधिलकीचे काम समजून मनापासून पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकी दरम्यान प्रत्येक तालुक्याच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रगतीत मागे राहिलेल्या तालुक्यांना गती देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी सांगितले की, जिल्हास्तरावरून योजनेच्या प्रगतीचे सतत निरीक्षण करण्यात येईल आणि कामकाजात झालेल्या कामचुकारपणा बद्दल कोणालाही सहनशीलता दाखविली जाणार नाही.
बैठकीस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) वर्षा फडोळ, सहायक प्रकल्प संचालक रमेश शेळके, तसेच सर्व तालुक्यातील ग्रामीण गृहनिर्माण अभियंते, मनरेगा कर्मचारी आणि डाटा एंट्री ऑपरेटर उपस्थित होते.
