नाशिक – होळीच्या धुळवडनंतर येणारी रंगपंचमी ही नाशिकच्या संस्कृतीचे वैभव. वेगवेगळ्या रंगांत रंगलेले चेहरे पाहिले की ‘जीवन के दिन…’ ही ओळ आपसूक गुणगुणली जाते. मात्र ज्यांच्या आयुष्यातले रंग उडाले, अशा एकल महिलांचे काय ? या प्रश्नावर नाशिक जिल्हा परिषदेने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सुरू केलेल्या नवचेतना अभियानाच्या माध्यमातून उत्तर शोधले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एकल महिलांसाठी ‘स्वावलंबी महिला रंगोत्सव’ कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
ग्रामीण भागातील अनेक विधवा महिलांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आयुष्यातील कठीण प्रसंगांना सामोरे जात अनेक वर्षे कुटुंबाची जबाबदारी सांभाळत त्यांनी स्वतःचा आनंद बाजूला ठेवला होता. समाजातील रूढी-परंपरा आणि परिस्थितीमुळे सण-उत्सवांपासून दूर राहणाऱ्या या महिलांसाठी हा रंगोत्सव भावनिक क्षण ठरला. अनेक महिलांनी सांगितले की, पतीच्या निधनानंतर रंगपंचमीसारखे सण साजरे करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता; मात्र आज जिल्हा परिषदेच्या या उपक्रमामुळे अनेक वर्षांनंतर त्यांनी आनंदाने रंग उधळत सण साजरा केला.
मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार म्हणाले, समाजातील एकल महिलांना अनेक सामाजिक आणि भावनिक आव्हानांचा सामना करावा लागतो. अशा महिलांना आनंदाचे आणि सन्मानाचे व्यासपीठ देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. तसेच ‘स्वावलंबी महिला रंगोत्सव’ हा केवळ रंगांचा उत्सव नसून त्यांच्या आयुष्यात आशा, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचे नवे रंग भरण्याचा प्रयत्न आहे. जिल्हा परिषद नाशिक पुढेही महिला सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन देत राहील, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे अशा अनेक महिलांचा सहभाग होता, ज्यांनी गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून एकदाही रंग लावला नव्हता. काहींच्या आयुष्यात वयाच्या विसाव्या वर्षीच दुःखाचे सावट आले, तर काही महिलांच्या आयुष्यात ४५ ते ५५ वर्षे ओलांडल्यानंतर अंधार पसरला. आयुष्यभर कुटुंब, मुले आणि जबाबदाऱ्यांसाठी स्वतःचा आनंद बाजूला ठेवणाऱ्या या महिलांना जिल्हा परिषदेने आनंदाने सण साजरा करण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व नवचेतना अभियानांतर्गत महिला सक्षमीकरण, सामाजिक समावेशन आणि ग्रामविकासासाठी जिल्हा परिषद नाशिक सातत्याने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असून जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा ‘स्वावलंबी महिला रंगोत्सव’ उपक्रम एकल महिलांच्या आयुष्यात आनंद, आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करणारा ठरला.
