नाशिक – विधवा पुनर्विवाहाचा कायदा अस्तित्वात आल्यानंतर आजही विधवांच्या पुनर्विवाहात अनेक अडथळे निर्माण होत असल्याची परिस्थिती लक्षात घेता विधवा पुनर्वसनाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषद, साऊ एकल महिला समिती आणि जगदंब फाउंडेशन यांच्या सहकार्याने एकल महिलांच्या पुनर्विवाहासाठी सर्वजातीय, मोफत वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा मेळावा १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या बहुउद्देशीय सभागृहात होणार आहे. या मेळाव्यासाठी नोंदणी होत असतांना इच्छुक वरांच्या तुलनेत महिलांचा अल्प प्रतिसाद आहे. सामाजिक मानसिकता आणि महिला स्वयंनिर्भरता यासह अन्य कारणांमुळे महिला पुन्हा सहसा लग्नासाठी तयार होत नाहीत.

करोनाच्या दोन लाटांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी झाली. यामध्ये बहुसंख्य घरांमधील कर्ते पुरूष गेले. काही ठिकाणी महिला गेल्या. यामुळे अनेकांचे संसार उदध्वस्त झाले. अशा स्थितीत विधवा पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर झाला. बहुसंख्य महिलांकडे विवाह झाल्याचे कागदपत्र नसल्याने अनेक महिलांना कुटूंबाच्या मालमत्तेतून बेदखल करण्यात आले.

काहींना केवळ कागदोपत्री स्वाक्षरीपुरता घरात आसरा राहिला. महिलांची ही स्थिती पाहता राज्यातून साऊ एकल महिला समितीच्या वतीने एकल महिला, घटस्फोटीत तसेच विधवा महिलांसाठी काम सुरू करण्यात आले. सद्यस्थितीत जिल्हा परिषदेच्या वतीने एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या नवचेतना उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद सेस निधीतून एक अभिनव योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून विधवांच्या पाल्यांच्या नावे एक लाख रुपये ठेव आणि रोजगारासाठी घेतलेल्या कर्जाचे ३० हजार रुपयांपर्यंतचे व्याज जिल्हा परिषदेच्या वतीने भरण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रात राहणाऱ्या विधवांना घेता येणार आहे. यापुढील टप्प्यात विधवा पुनर्विवाहाचा मुद्दा हातात घेण्यात आला आहे.

पुनर्विवाहात मुलांची जबाबदारी हा मोठा अडथळा असतो. अनेकदा पुरुषांकडून मुलांना माहेरी सोडून येण्याच्या अटी घातल्या जातात, ज्यामुळे महिला पुनर्विवाहास तयार होत नाहीत. या परिस्थितीवर उपाय म्हणून पुनर्विवाह करणाऱ्या विधवांच्या दोन अपत्यांच्या नावावर जिल्हा परिषदेकडून एक लाख रुपयांची ठेव पावती ठेवण्यात येणार आहे. ही ठेव संबंधित मुला–मुलींच्या नावाने असून, त्यांचे वय १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत ही रक्कम काढता येणार नाही. या योजनेसाठी ७५ लाख रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे.

नाशिक येथे १४ डिसेंबर रोजी होणाऱ्या विधवा पुनर्विवाह मेळाव्यास एकल महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी केले. मेळाव्याचे नियोजन केल्यापासून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातुन विवाह उत्सुक मुलांकडून नोंदणी आहे.

यामध्ये ज्यांचा विवाह झालेला नाही. परंतु, वय ३५ पुढे गेले, अशा उच्चशिक्षित वरांचा समावेश आहे. त्यांची महिलेला मुलांसह स्विकारण्याची तयारी आहे. मात्र विधवा तसेच घटस्फोटीत महिलांकडून अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. याविषयी संयोजकांनी महिला आर्थिक निर्भर होत असल्याने तसेच आजही विधवा किंवा घटस्फोटीतांचा विवाह हा मुद्दा गौण ठरत असल्याने पुरूषांच्या तुलनेत महिलांचा विवाह नोंदणीस प्रतिसाद कमी असल्याचे सांगण्यात आले.