नाशिक: जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण ‘सुपर-१००’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी निवड चाचणी परीक्षा आठ मे रोजी होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही परीक्षा जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील एकूण २५ केंद्रांवर एकाच दिवशी सकाळी ११ ते १ या वेळेत होणार आहे. परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांनी वेळेआधी १० वाजता संबंधित परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
ग्रामीण व शैक्षणिकदृष्ट्या वंचित भागातील विद्यार्थ्यांना जेईई आणि नीट यासारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी सक्षम बनविणे, हा ‘सुपर-१००’उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक मार्गदर्शन, आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत. निवड चाचणी परीक्षेसाठी आवश्यक असलेली आसन व्यवस्था, परीक्षा केंद्रांची माहिती व इतर तपशील जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.
परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांकडे निळ्या अथवा काळ्या रंगाच्या शाईचा बॉलपेन आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी येताना इयत्ता १० वी परीक्षेचे प्रवेशपत्र, आधारकार्ड सोबत आणावे. कोणत्याही गैरसोयी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सदर परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना देखील ऐनवेळी आपल्या नजीकच्या परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षेस बसता येणार आहे.
निवड चाचणी परीक्षेसाठी केंद्रांची तालुकानिहाय यादी – बागलाणसाठी मराठा इंग्लिश स्कूल, सटाणा, चांदवडसाठी नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालय, जे.आर.जी. विद्यालय, देवळ्यासाठी श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल, दिंडोरीसाठी जनता इंग्लिश स्कूल, इगतपुरीसाठी जनता विद्यालय घोटी, आदर्श कन्या विद्यालय, घोटी, कळवणसाठी आर. के. एम. विद्यालय, मालेगावसाठी के. बी. एच. विद्यालय, आर. व्ही. एच. कन्या विद्यालय, मालेगाव कॅम्प, नांदगावसाठी न्यू इंग्लिश स्कूल, व्ही. जे. हायस्कूल, कमलाबाई माणिकचंद कासलीवाल माध्यमिक विद्यालय, नांदगाव, नाशिकसाठी डी.. डी. बिटको बॉईज हायस्कूल, निफाडसाठी वैनतेय विद्यालय, पेठसाठी डॉ. विजय बिडकर विद्यालय, सिन्नरसाठी वाजे विद्यालय, सुरगाण्यासाठी नूतन विद्यालय, ज़िल्हा परिषद शाळा सुरगाणा नंबर २, तुळजाभवानी नर्सिंग कॉलेज, माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा, प्रगती माध्यमिक विद्यालय, खोकरी, त्र्यंबकेश्वरसाठी ब्रम्हा व्हॅली पब्लिक स्कूल अंजनेरी, नूतन त्र्यंबक विद्यालय, त्र्यंबकेश्वर आणि येवल्यासाठी स्वामी मुक्तानंद विद्यालय ही केंद्र आहेत.
