लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक: अखिल भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या नाशिक शाखेच्या वतीने १० आणि ११ जून रोजी येथे ‘नाशिकॉन २०२३’ या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्र्यंबक रस्त्यावरील हॉटेल ग्रेप काउंटी रिसॉर्ट येथे होणाऱ्या या परिषदेत राज्यभरातून ४०० हून अधिक बालरोग तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.

याविषयीची माहिती अखिल बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ.अनिरुद्ध भांडारकर, ‘नाशिकॉन’चे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य बालरोग तज्ज्ञ संघटनेचे समन्वयक डॉ.मिलिंद भराडिया, परिषद आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन सुराणा या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. या परिषदेनिमित्त सामाजिक उपक्रम राबविला जाणार आहे. नोंदणीतून संकलित निधीपैकी एक लाख रुपयांची रक्कम दान राशी म्हणून वापरली जाणार आहे. या निधीतून पाच आदिवासी शाळा दत्तक घेतल्या जाणार असून येथील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निधीचा विनिमय केला जाईल, असे डॉ. भांडारकर यांनी सांगितले.

हेही वाचा… मनमाड: अन्न महामंडळाच्या गोदामातून २७ क्विंटल तांदळाची चोरी

डॉ. भराडिया यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने २०१५ साली बालरोग तज्ज्ञांच्या साथीने ‘नाशिकॉन’ परिषदेला सुरुवात केल्याचे नमूद केले. आजारांचे बदलते स्वरूप, उपचारातील आधुनिक पद्धतींची माहिती बालरोग तज्ज्ञांपर्यंत पोचविण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या परिषदेचे यंदाचे सहावे वर्ष आहे. या परिषदेत लहान मुलांमधील गुंतागुंतीचे आजार, त्यावरील उपचार, लसीकरण, उपचारातील आधुनिक पद्धती आदींबाबत सत्रांतून मार्गदर्शन केले जाणार आहे. परिषदेच्या उद्घाटनासाठी मुंबई येथील लीलावती आणि हिंदुजा रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ विभागाच्या प्रमुख डॉ. उमा अली यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच अखिल भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.उपेंद्र किंजवडेकर, महाराष्ट्र राज्य बालरोग तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. रमाकांत पाटील, सचिव डॉ.अमोल पवार, कॉलेज ऑफ फिजिशियन ॲण्ड सर्जन, मुंबई येथील अध्यक्ष डॉ.गिरीश मैंदणकर उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा… नाशिक: आरोग्य विद्यापीठातर्फे उद्या फेरी, टपाल तिकीट प्रकाशन

आयोजन समितीच्या सचिव डॉ. सुलभा पवार यांनी परिषदेत विविध सत्रांतून सहभागी डॉक्टरांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार असल्याचे सांगितले. परिषदेनिमित्त राज्यभरातून नाशिकला दाखल होणाऱ्या बालरोग तज्ज्ञांना शहराची सफर घडविली जाणार आहे. यानिमित्त नाशिकच्या अर्थकारणालाही चालना मिळण्यास मदत होणार आहे. आधुनिक वैद्यक शास्त्रात उपलब्ध झालेल्या उपचारांची माहिती या माध्यमातून दिली जाईल. त्यास बालरोग तज्ज्ञांचा आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळाल्याचे वित्त समितीच्या प्रमुख डॉ.वैशाली भराडिया यांनी सांगितले.

हेही वाचा… समाज माध्यमातून सामाजिक तेढ वाढविल्यास कारवाई, पोलिसांचा इशारा

परिषदेनिमित्त डॉक्टरांसाठी विरंगुळा म्हणून ‘लव्ह यू जिंदगी’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयेाजन केले आहे. बालरोग तज्ज्ञांसाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात रॅम्पवॉक, नृत्य, गायनासह अन्य विविध कलांचे सादरीकरण सहभागी डॉक्टर करणार आहेत. परिषद यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीच्या सचिव डॉ.सुलभा पवार, बालरोग तज्ज्ञ संघटना नाशिक शाखेचे सचिव डॉ. सचिन पाटील, खजिनदार डॉ. प्राची बिरारी, डॉ. पवन देवरे, डॉ. शीतल मोगल, डॉ. प्रकल्प पाटील आदींकडून परिश्रम घेतले जात आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashikon 2023 has been organized on 10th and 11th june on behalf of paediatricians association of nashik dvr
First published on: 09-06-2023 at 12:35 IST