नाशिक – सिडको परिसरात तीन ते चार दिवसांपासून गुंडांचा धुमाकुळ वाढला आहे. त्रिमूर्ती चौक परिसरात टोळक्याने केलेली वाहनांची तोडफोड चर्चेत असतानाच बुधवारी रात्री मारहाणीच्या कारणाने एकावर कोयत्याने वार करण्यात आले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिका निवडणूक संपताच शहरात पुन्हा गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे गुन्हेगारांकडून वदवून घेतले जात असतांना आता पुन्हा एकदा पोलिसांची पकड ढिली पडत असल्याचे दिसू लागले आहे. त्यामुळे पोलीसांना आव्हान देणाऱ्या घटना सातत्याने घडत आहेत. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग दुसऱ्या दिवशी शस्त्रधारी युवकांनी दहशत माजवत खुटवड नगर परिसरात धुमाकूळ घातला.
श्रीपाद निवासी संकुलाच्या प्रवेशद्वाराला एका चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. यावेळी येथील रहिवाशांनी गाडी काढायला आणि दोघा जखमींना मदत केली. चालकाने त्या ठिकाणी गाडी काढत पोबारा केला. याच दरम्यान गाडीमध्ये १५ ते २० जणांचे टोळके नशा करत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी सावध पवित्रा घेत ११२ या क्रमांकावर संपर्क करत पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्याआधी गाडीतील युवकांनी बाहेर येत तलवार, दांडे, कोयते घेत इमारतीच्या परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. टोळक्याने किशोर मटाले या युवकावर कोयत्याने वार केले. मटाले जखमी झाल्याचे लक्षात येताच टोळक्याने पोबारा केला.
पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी घटनास्थळी आणि अंबड पोलीस ठाण्याला भेट देत संशयितांवर कारवाईच्या सूचना दिल्या. रात्री संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. काहींची धरपकड करण्यात आली. या प्रकाराची माहिती समजताच नगरसेविका सुवर्णा मटाले, साधना मटाले, माजी नगरसेवक तानाजी जायभावे यांनी अंबड पोलीस ठाणे गाठत संशयितांविरुध्द कारवाई करण्याची मागणी केली. या विषयी सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी खुटवड नगर प्रकरणात चार जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगितले. मात्र हा हल्ला का झाला, याविषयी अद्याप स्पष्टता नाही. सध्या वेगवेगळ्या गुन्ह्यातील संशयित ताब्यात असून त्यांच्याकडे चौकशी सुरू असल्याचे बारी यांनी नमूद केले.
अंबड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात गुन्हेवाढ
अंबड परिसरात औद्योगिक वसाहत आहे. जवळच कामगारबहुल वस्ती आहे. बऱ्याचदा लहान- मोठ्या कारणांवरून वादविवाद होतात. काही वेळा हे प्रकरण थेट मारामारी, हत्येपर्यंत पोहचते. मागील तीन दिवसात त्रिमूर्ती चौक परिसरात २० जणांच्या टोळक्याने धुडगूस घालत वाहनांची नासधुस केली. या प्रकरणात अल्पवयीन मुलांचा सहभाग होता. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले आहे. याशिवाय कोयता हल्ला प्रकरणात चार संशयित ताब्यात आहेत. मात्र सतत घडणाऱ्या घटनांनी परिसरात नागरिकांच्या मनात दहशत बसली आहे.

