नाशिक – खो-खो या अस्सल मराठी मातीतील खेळासाठी महाराष्ट्रातील एकमेव निवासी खो-खो प्रबोधिनी नाशिकमध्ये कार्यरत आहे. या प्रबोधिनीने आजवर अनेक खेळाडू महाराष्ट्राला दिले आहेत. पुन्हा एकदा नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशन संचलित स्व. सौ. सुरेखाताई भोसले निवासी खो-खो प्रबोधिनी राष्ट्रीय स्पर्धा गाजविण्यास तयार झाली आहे. राजस्थान येथे १४ वर्षांआतील शालेय राष्ट्रीय खो- खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा नाशिकच्या निवासी खो-खो प्रबोधिनीसाठी खास आहे. या स्पर्धेसाठी प्रबोधिनीच्या खेळाडूची महाराष्ट्राच्या प्राथमिक संघात निवड झाली आहे.
नाशिक येथे कार्यरत सौ. सुरेखाताई भोसले निवासी खो-खो प्रबोधिनीत प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील खेळाडूंचा समावेश आहे. नाशिक येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये खो-खो प्रबोधिनीचे खेळाडू दररोज सकाळ आणि सायंकाळी सराव करतात. खो-खो खेळात नाशिकची पताका उंचावण्याचे काम सुरेखाताई भोसले निवासी खो-खो प्रबोधिनीने केले आहे.
वेगवेगळ्या गटांच्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी प्रबोधिनीच्या खेळाडूंची निवड होत असते. तेलंगणातील काझीपेठ, वारंगल येथे सध्या सुरु असलेल्या पुरुष आणि महिला वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत प्रबोधिनीचे दिलीप खांडवी, वृषाली भोये, कौसल्या पवार, सरीता दिवा हे चार खेळाडू खेळत आहेत. नाशिक जिल्हा खो-खो संघटनेच्या ५० वर्षाच्या इतिहासात दुसऱ्यांदा एकाच वेळी चार खेळाडूंची निवड राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी झाली आहे. विशेष म्हणजे हे चार खेळाडू या स्पर्धेत तीन वेगळ्या संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
दिलीप खांडवी हा भारतीय रेल्वे संघाचे, सरीता दिवा महाराष्ट्राचे तर वृषाली भोये, कौसल्या पवार भारतीय विमानतळ प्राधिकरण, स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड यांचे प्रतिनिधित्व करणार आहे. दिलीप खांडवी, वृषाली भोये, कौसल्या पवार यांची ही सलग चौथी वरिष्ठ गट राष्ट्रीय स्पर्धा असून एकापेक्षा जास्त वरिष्ठ गट राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणारे हे तिघेही नाशिकचे पहिले खेळाडू आहेत.
सरीता दिवा हिची पहिली वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा असून यंदा एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचे आंतर विद्यापीठ स्पर्धेत तिने नेतृत्व केले आहे. महाराष्ट्राच्या संघात नाशिकचे प्रतिनिधित्व करणारे दिलीप खांडवी, वृषाली भोये, कौसल्या पवार हे नाशिकच्या पंचवटीतील लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचे तर सरीता दिवा ही एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून हे चारही संस्कृती नाशिकचे खेळाडू आहेत. हे सर्व खेळाडू छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे वर्षभर सकाळ आणि सायंकाळ दोन्ही वेळेस उमेश आटवणे आणि गीतांजली सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत असतात.
सलग दुसऱ्या वर्षी नाशिक जिल्ह्याच्या इतिहासात चार खेळाडूंची निवड झाल्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत असतानाच १६ जानेवारी ते २१ जानेवारी या कालावधीत राजस्थानातील करकी येथे आयोजित १४ वर्षांआतील शालेय राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक खो- खो संघात संस्कृती नाशिक आणि स्व. सौ सुरेखाताई भोसले निवासी खो- खो प्रबोधिनीची खेळाडू सृष्टी शिंदेची निवड झाली आहे सृष्टी ही नाशिकच्या शासकीय कन्या शाळेची विद्यार्थिनी आहे .सृष्टी शिंदे ही उमेश आटवणे आणि गीतांजली सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे वर्षभर सकाळ आणि सायंकाळी नियमित सराव करत असते.
