नाशिक – कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या वृक्षतोडीबाबत राष्ट्रीय हरित लवादाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय जिल्ह्यात एकही झाड तोडू नये, असे यापूर्वीच दिलेले आदेश २० फेब्रवुारीपर्यंत कायम ठेवले आहे. तपोवनातील वृक्षतोडीबाबत गठीत केलेल्या समितीत महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरण आणि नाशिक जिल्हाधिकारी यांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे.
हरित लवादाच्या आदेशानंतरही झाडे तोडली गेल्याचा मुद्दा याचिकाकर्ते ॲड. श्रीराम पिंगळे यांनी मांडला. तपोवनातील वृक्षतोडीचा विषय गाजत असताना समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी ब्रिटीशकालीन जुन्या वडाच्या झाडांची तोड झाल्याचे उघड झाले होते. सांडपाणी प्रक्रिया केंद्रांसाठी शहरात १२७० वृक्ष तोडली गेली आहेत. तपोवन वृक्षतोड प्रकरणात लवादाने झाडे तोडण्यास तात्पुरती स्थगिती दिली असताना सिंहस्थनगर येथे नवीन पूल आणि तिडके कॉलनी ते कर्मयोगीनगरपर्यंतच्या रस्ता कामासाठी महापालिका ११४ झाडे तोडत असल्याचे समोर आले. बेकायदेशीरपणे झाडे तोडली जात असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. सुनावणीत नेमकी किती झाडे तोडली गेली याचा पुरावा नाही. या संदर्भात पुरावे सादर केल्यास दोषींवर दंडात्मक कारवाई करता येईल, असे लवादाने सूचित केले.
तपोवन वृक्षतोडीबाबत स्थापलेल्या समितीत वन विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीने नऊ जानेवारी रोजी तपोवनमध्ये पाहणी केली होती. मात्र, अधिकारी निवडणूक कामात असल्याने अहवाल पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे हा अहवाल सादर करण्यास दोन आठवड्यांची अतिरिक्त वेळ मंजूर करण्यात आली. याचिकाकर्ते ॲड. श्रीराम पिंगळे यांनी या समितीची पूनर्रचना करण्याची केलेली मागणी लवादाने मान्य केली. आता या समितीत महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरण आणि नाशिक जिल्हाधिकारी यांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात एकही झाड न तोडण्याबाबत पूर्वी दिलेला आदेश पुढील सुनावणीपर्यंत कायम राहणार असल्याचे लवादाने स्पष्ट केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० फेब्रुवारी रोजी होणार आहे.
हरित लवादाच्या निर्देशानुसार तपोवन वृक्षतोडीबाबत समिती स्थापन झाली आहे. या समितीचे पूर्नगठन होऊन आपल्या विभागालाही त्यात समाविष्ट करण्यात आल्याचे पत्र महाराष्ट्र वृक्ष प्राधिकरण आणि नाशिक जिल्हाधिकारी यांना पाठविले जाणार असल्याचे याचिकाकर्ते ॲड. श्रीराम पिंगळे यांनी सांगितले. दरम्यान, कुंभमेळ्यातील विविध कामांसाठी होणारी वृक्षतोड दोन महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिडके कॉलनीत पुलाच्या कामासाठी झालेली वृक्षतोडीचा विषय स्थगितीच्या आधीचा असून त्यात कायदेशीर प्रक्रियांचे पालन झाल्याचा दावा महापालिकेने आधीच केला आहे.
