नाशिक: उत्तर प्रदेशातील मोदी नगरात नाशिक जिल्ह्यातील मनमाडच्या खेळाडुंनी आपल्या कामगिरीचा डंका वाजविला आहे. मनमाडच्या खेळाडुंकडून अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली आहे. मोदी नगर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये मनमाडचे खेळाडू चांगली कामगिरी करतील, असा विश्वास प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांनी केला होता. त्याप्रमाणे मनमाडच्या खेळाडुंनी एक सुवर्णपदक, रौप्यपदक आणि कांस्यपदकाची नोंद केली आहे.
महाराष्ट्रात वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील मनमाडने पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला आहे. उत्तर प्रदेशातील मोदीनगर येथे ४ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत राष्ट्रीय युथ ज्युनिअर आणि सिनिअर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप सुरु आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या संघात मनमाडच्या सहा खेळाडुंचा समावेश आहे. मनमाडसाठी ही गौरवास्पद बाब मानली जाते. वेटलिफ्टिंगसारख्या काहीशा त्रासदायक खेळाकडे मुलांना आणि त्यांच्या पालकांना आकर्षित करणे, खरोखरच दिव्य मानावे लागेल. त्यातही असे प्रयत्न मनमाडसारख्या ग्रामीण भागात होत असतील तर त्यांच्या या प्रयत्नांना निश्चितच दाद द्यावयास हवी. प्रतिकूल परिस्थितीत वेटलिफ्टिंग हा क्रीडा प्रकार मनमाडमध्ये रुजविणे आणि तो बहरात आणणे, अशी कामगिरी प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
अनेक वर्षांच्या कठीण परिस्थितीनंतर मनमाडमधील खेळाडू वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करु लागले आहेत. राष्ट्रकुल, एशियाड यासारख्या स्पर्धांमध्ये नजीकच्या भविष्यात मनमाडच्या वेटलिफ्टरने पदक मिळविल्यास त्यात आश्चर्य वाटण्यासारखेच काहीच नाही.
मनमाडच्या खेळाडुंनी आपली दैदिप्यमान कामगिरी मोदी नगर येथील राष्ट्रीय युथ ज्युनिअर आणि सिनिअर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेतही सुरु ठेवली आहे.. या स्पर्धेसाठी मनमाडच्या सहा खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड झाली. त्यात आतरराष्ट्रीय खेळाडू साईराज परदेशी, आकांक्षा व्यवहारे, राष्ट्रीय पदक विजेते कृष्णा व्यवहारे, आनंदी सांगळे, साहिल जाधव, श्रावणी पुरंदरे यांचा समावेश आहे. भारतातील विविध राज्यातील ५५० खेळाडू पुरुषांच्या आठ आणि महिलांच्या आठ विविध वजनी व वयोगटात सहभागी झाले आहेत.
युथ ज्युनिअर विभागात ७१ किलो वजन गटात मनमाडच्या जय भवानी व्यायामशाळा आणि वागदर्डी विद्यालयाच्या साहिल जाधवने १२२ किलो स्नॅच आणि १५१ किलो क्लीन जर्क असे एकंदर २७३ किलो वजन उचलून चुरशीच्या लढतीत सुवर्णपदक पटकाविले. मनमाडच्याच छत्रे विद्यालयाची आनंदी सांगळे हिने ७७ किलो युवा ज्युनिअर गटात ८२ किलो स्नॅच ९६ किलो क्लीन जर्क १७८ किलो वजन उचलून रौप्य पदक मिळविले. तिचे सुवर्णपदक अवघ्या एक किलोने हुकले. ६५ किलो वजन गटात मनमाडच्या जय भवानी व्यायामशाळा आणि जळगाव (निंबायती) येथील गो. य. पाटील विद्यालयाच्या कृष्णा व्यवहारेने ११८ किलो स्नॅच व १४० किलो क्लीन जर्क असे एकंदर २५८ किलो वजन उचलून चुरशीच्या लढतीत कांस्यपदक पटकाविले. मनमाडच्या खेळाडुंना प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

