एखाद्या अजरामर किंवा आशयसंपन्न, वैविधता असलेल्या साहित्य कृतीवर ‘सिनेनिर्मिती’ प्रेक्षकांसाठी नवी राहिलेली नाही. वाचकांच्या पसंतीची मोहर उमटल्यानंतर प्रेक्षकांनीही त्या विषयाला उत्स्फुर्त दाद दिली आहे. मात्र साहित्य ते चित्रपट असा प्रवास होत असतांना त्यात होणारे बदल, त्यामुळे उद्भवणारे वाद, त्या साहित्यकृतीची समीक्षणे पाहत अनेकांनी मूळ लेखन समजून घेण्यास सुरूवात केली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेला वि. वा. शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’ नाटकावरून ‘नटसम्राट- असा नट होणे नाही.’ असो किंवा ना. स. इनामदारांच्या ‘राऊ’ वरून तयार झालेला ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपट असो.. अनेक वाचक आणि प्रेक्षकांकडून मूळ लेखनाकडे मोर्चा वळवत त्यातील सत्यता पडताळण्यास पसंती दिली जात आहे. त्यामुळे शहरातील वाचनालयांमध्ये उपरोक्त कादंबरीसाठी प्रतीक्षा यादी असल्याचे लक्षात येते.
विषय, आशयघनता, मांडणी, ओघवती शैली यासह अन्य काही वैशिष्ठय़ांमुळे काही विशिष्ट मराठी साहित्याने एकूणच साहित्य विश्वात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. काळानुरूप वाचकांची अभिरूची बदलत असली तरी मूळ आशय हा नेहमीच दर्दीना साद घालतो. सिनेसृष्टीतील अनेकांनी ही मेख लक्षात घेत साहित्यावर लक्ष केंद्रीत वेगळा प्रयोग म्हणून साहित्यकृतीवर चित्रपट काढण्याचे धाडस केले. मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत याची सुरूवात खुप आधीच झाली होती. सध्या हा ‘ट्रेड’ प्रकर्षणाने दिसत आहे. मिलिंद बोकील यांच्या ‘शाळा’ कादंबरीवर सुजय डहाके यांनी प्रेक्षकांसाठी मोठय़ा पडद्यावर ‘शाळा’ भरवली. त्यांच्या पाठोपाठ सुहास शिरवळकर यांच्या ‘दुनियादारी’ या कादंबरीवर दिग्दर्शक संजय जाधव यांनी ‘दुनियादारी’ चित्रपटाची निर्मिती केली. यामध्ये मूळ आशयात दिग्दर्शकाचे अधिकार घेत पटकथेच्या आधारे आमुलाग्र बदल करण्यात आले. मूळ कादंबरीत शेवट वास्तविक जीवनातील दुनियादारी दाखवणारी असली तरी चित्रपटाचा शेवट सुखद ‘दुनियादारी’त दाखविण्यात आला आहे. चित्रपट असल्या कारणाने आणि त्यातही प्रेमकथा असल्यामुळे हा बदल अनेकांनी सहज स्विकारला. सध्या ‘नटसम्राट’ नाटकावर आधारीत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ‘नटसम्राट- असा नट होणे नाही’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. मूळ आशयात मांजरेकर यांनी काही बदल करत नव्या सशक्त व्यक्तीरेखा रसिकांसमोर आणल्या. प्रेक्षकांनी हा बदल देखील सहज स्विकारला. दुसरीकडे, थोरले बाजीराव हा मूळ विषय असलेली ‘राऊ’ ही ऐतिहासिक कादंबरी पुन्हा एकदा दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’मुळे प्रकाशझोतात आली. थोरले बाजीरावांचे कर्तृत्व, त्यांच्या आयुष्यात झालेला मस्तानीचा प्रवेश हा अनाकलनीय घटनांची नांदी ठरला. हीच कथा चित्रपटात वेगळ्या स्वरूपात दाखवितांना मूळ आशयात काही बदल करण्यात आले. मात्र यामुळे इतिहासाची छेडछाड झाल्याचा आरोप, पेशव्यांच्या कर्तृत्वावर प्रश्न, मस्तानी-काशिबाई यांच्यातील संबंध यासह विविध विषयांवर आक्षेप घेतले गेले. उपरोक्त दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अनेक प्रेक्षकांचा मूळ कादंबरीचे वाचन करण्याकडे कल आहे. साहित्य कृतीतील मूळ आशयात होणारे बदल, त्यावरून झालेले वाद, आक्षेप लक्षात घेत आजची तरूणाई आणि प्रेक्षकही मूळ लिखाण आहे तरी काय, संहीता कशी हे जाणून घेण्यासाठी वाचनालयाकडे वळाल्याचे दिसून येते. मूळ लेखनाकडे एकाच वेळी मोठय़ा संख्येने वाचक वळल्याने बहुतांश वाचनालयात त्या कादंबरी मिळेनाशा झाल्या आहेत. सार्वजनिक वाचनालयात हीच स्थिती आहे.