नाशिक : शहरात दोन कार्यक्रमांच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आलेले पालकमंत्री छगन भुजबळ आणि माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे संवाद साधताना थेट राजकीय भाष्य टाळले. परस्परांप्रती आदरभाव व्यक्त केला. एका कार्यक्रमात पंकजा यांनी वडिलांचे मित्र असणारे भुजबळ हे आपल्यासाठी ज्येष्ठ मार्गदर्शक असल्याचे सांगितले तर, भुजबळ यांनी पंकजा या आपल्या मुलीसमान असल्याचे नमूद केले.

सोमवारी संदर्भ सेवा रुग्णालयातील नव्या इमारतीचे भूमिपूजन आणि नामको बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन हे दोन्ही कार्यक्रम मुंडे आणि भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. वेगवेगळय़ा पक्षातील ओबीसी नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या कार्यक्रमांकडे सर्वाचे लक्ष होते. संदर्भ रुग्णालयातील कार्यक्रमात अनुभव, वय, राजकारण या सर्व दृष्टीने भुजबळ ज्येष्ठ असल्याचे मुंडे यांनी सांगितले. त्यांनी आपला सन्मान केल्यामुळे आपण केवळ एक मिनिट बोलणार असल्याचे त्या म्हणाल्या. आमदार देवयानी फरांदे यांच्या रुग्णालय कामासाठीच्या पाठपुराव्याचा उल्लेख करीत महिलांना जास्तीचा पाठपुरावा करावा लागतो, दबंगपणा करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

भुजबळ यांनी यावेळी कुठलेही राजकीय भाष्य केले नाही. सर्व आजांरावर उपचार होण्यासाठी शहरात वैद्यकीय पर्यटन केंद्र तयार करण्याचा मानस व्यक्त केला. नाशिकमध्ये येणाऱ्यांना पर्यटनाकरिता पर्याय उपलब्ध व्हावे यासाठी शहराची आरोग्यासह बहुपर्यटन केंद्राकडे वाटचाल होत आहे. नाशिकचा विकास आरोग्य, पर्यटन आणि शैक्षणिक या तिन्ही घटकांवर करण्यात येणार आहे.

जेणेकरुन उत्तर महाराष्ट्रातील नागरिकाला याचा लाभ घेता येईल, असे ते म्हणाले. यावेळी माजीमंत्री जयकुमार रावल, आमदार देवयानी फरांदे, महापौर सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर भुजबळ-मुंडे हे नामको बँकेच्या कार्यक्रमात पुन्हा एकत्र आले.  यावेळी पंकजा यांनी भुजबळ हे आपले ज्येष्ठ मार्गदर्शक असल्याचे नमूद केले. आम्ही अशा वर्गातून येतो की तिथे संघर्षांशिवाय काही मिळत नाही. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ  मुंडे यांच्या मार्गदर्शनानुसार आपली राजकीय वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. भुजबळ यांनी दोन्ही बाजुला आपल्या मित्रांची मुले असल्याचा उल्लेख केला. सहकार, बँकिंग यावर टिपण्णी करत  भुजबळ यांनी आपले काही अनुभव कथन केले.