मराठीच्या संवर्धनाबाबत राजकीय सिंहावलोकनाची गरज ! ; शरद पवार यांचे प्रतिपादन; साहित्य संमेलनाचा समारोप

महाविद्यालयीन शिक्षणासाठी सुद्धा मराठीपेक्षा इंग्रजीला पसंती दिली जाते. हा धोका फार मोठा आहे.

शफी पठाण, अनिकेत साठे

कुसुमाग्रजनगरी, नाशिक : मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राजकीय इच्छाशक्ती कुठे कमी पडली, याचे सिंहावलोकन करण्याची वेळ आता आली आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी मराठी साहित्य संमेलनात व्यक्त केले.

नाशिक येथे आयोजित ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते.

मराठी भाषिकांचे राज्य निर्माण झाले. त्या राज्यात मराठी भाषेचे नेमके काय झाले? आपण आपल्या भाषेच्या जतनासाठी, संवर्धनासाठी नेमके काय केले? आज मराठी भाषा नेमकी कुठे आहे? याचा लेखाजोखा मांडून मराठी भाषेच्या सर्वागीण वृद्धीसाठी राज्य शासनाने पुन्हा कार्यक्रम हाती घ्यावा, असे आवाहन पवार यांनी केले. पदवी, पदव्युत्तर शिक्षणात मराठी भाषेचा वापर कमी होत आहे. दहावीपर्यंत मराठी भाषा आहे. परंतु, पदवी आणि नंतरच्या अध्यापनात मराठी दिसत नाही. मराठीची पिछेहाट होण्यामागे हे एक महत्वाचे कारण आहे. महाविद्यालयीन शिक्षणासाठी सुद्धा मराठीपेक्षा इंग्रजीला पसंती दिली जाते. हा धोका फार मोठा आहे. संख्येअभावी मराठी भाषा बंद होण्याइतपत गंभीर स्थिती निर्माण होताना दिसते. त्यामुळे पदवी आणि नंतरचे विज्ञान, वाणिज्य व इतर शिक्षण मराठीतून देण्याचा विचार व्हावा अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली. नवमाध्यमांमध्ये मराठीचा प्रसार होण्यासाठी आश्वासक प्रयत्नांची गरज आहे, असेही पवार म्हणाले. 

साहित्यिकांनी भूमिका घ्यावी : थोरात

एक अभिनेत्री स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले असे सांगते, त्याला काही लोक दुजोराही देतात. मात्र, या घटनेवर कुठलाही साहित्यक बोलत नाही, याचे दुख वाटते, असे मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मांडले. आणिबाणीच्या काळात दुर्गा भागवत यांनी कठोर भूमिका घेतली. साहित्य संमेलनात यशवंतराव चव्हाण यांना व्यासपीठावर येऊ  दिले नाही. साहित्यिकांमध्ये राजकारण बदलण्याची क्षमता आहे. सध्या राज्यघटनेवर धोक्याचे ढग दाटले आहेत. हे संकट साहित्यकांपर्यंत पोहोचण्याची भीतीही थोरात यांनी व्यक्त केली. राजकारणात आता कट्टरता आली आहे. पाश्चात्य देशांत लेखक, माध्यमांनी या कट्टरतेला विरोध केला. राज्यघटनेप्रमाणे देश चालतोय की नाही हे पाहण्याचे काम लेखकांचे आहे. राज्यघटना संकटात येईल तेव्हा साहित्यकांची मदत लागेल, म्हणून साहित्यिकांनी सजग असले पाहिजे, असेही थोरात म्हणाले. 

आदर्शाचा अपमान कसा झाला : भुजबळ

साहित्य संमेलन भरवताना या परिसराला ‘कुसुमाग्रजनगरी’ असे नाव देण्याचे ठरले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यावरून वाद झाले. ‘कुसुमाग्रजनगरी’ नाव देणे चुकले नाही. यात आदर्शाचा अपमान कुठे झाला? खरे तर यावरून खुपदा समजावून सांगितले. सावरकर यांचे नाव कवी मंचाला देण्यात आले. याशिवाय संमेलनात अनेक ठिकाणी त्यांच्या नावाचा वापर करण्यात आला. मात्र काहींना द्राक्षे आबंटच वाटतात, असा टोला संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी लगावला. साहित्य महामंडळाने नेहमी नाशिकला यावे. संमेलन भरवावे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीही नाशिकला येत राहावे. पुन्हा या, म्हटले तर गरबड होते. म्हणून आपण परत या, दरवर्षी या असे म्हणू, असे भुजबळ म्हणाले. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncp chief sharad pawar in marathi sahitya sammelan zws