नाशिक – रणजी करंडक असो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा आयपीएल. कोणत्याही स्पर्धेत भल्याभल्या फलंदाजांची दांडी उडविणारे, बाउन्सर टाकून फलंदाजांना हादरविणारे जलदगती गोलंदाज सर्वांच्या लक्षात राहतात. जलदगती गोलंदाजांच्या भन्नाट वेगापुढे अनेक फलंदाज हतबल होतात. आपणही जसप्रीत बुमराह, मोहमद सिराज यांच्यापेक्षा अधिक जलद गोलंदाजी करु शकतो, असे अनेक नवोदितांना वाटत असते. आपणास एक संधी मिळाल्यास आपणही आपल्यातील कौशल्य जगाला दाखवू शकतो, असे त्यांना वाटत असते. अशा नवोदित आणि प्रस्थापित जलदगती गोलंदाजांसाठी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेने (एनडीसीए) संधीचे दार उघडण्याचे ठरविले आहे.

क्रिकेटमध्ये असलेला पैसा, प्रसिध्दी यामुळे अनेक जण क्रिकेटमध्ये कारकीर्द करण्याची स्वप्न पाहत असतात. अर्थात भारतासारख्या क्रिकेट हाच धर्म मानणाऱ्या देशात क्रिकेटच्या जिल्हा संघातही स्थान मिळविण्यासाठी प्रचंड चुरस असते. फलंदाज होणाऱ्यांची संख्या अधिक असली तरी गोलंदाजांनाही तितकेच महत्व असते. त्यामुळेच जसप्रीत बुमराह, मोहमद सिराज यांच्यासारख्या जलदगती गोलंदाजांच्या हातात कर्णधार जेव्हा चेंडू सोपवितो, तेव्हां त्याला विश्वास असतो की, हे समोरच्या फलंदाजाला बाद करु शकतील. आणि बहुसंख्य वेळा त्यांचा विश्वास सार्थ ठरतो.

जलदगती गोलंदाजांचा वेग पाहून अनेकांना आपणही त्यांच्यासारखे व्हावे, असे वाटते. कित्येकांना तर आपण बुमराहपेक्षा जलद गोंलंदाजी करु शकतो, असेही वाटते. अशा उदयोन्मुख तसेच प्रस्थापित जलदगती गोलंदाजांना त्यांचा वेग आजमावण्याची संधी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे नाशिक येथे प्रथमच उपलब्ध करून देण्यात येत आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व्यावसायिक पद्धतीने जलदगती गोलंदाजांसाठी गुणवत्ता शोध मोहीम (Fast Bowling Talent Hunt) राबवित आहे. यासाठी खास रडार स्पीड गनच्या सहाय्याने गोलंदाजांच्या वेगाची चाचणी घेण्यात येईल.

बक्षीसही मिळणार

विशेष म्हणजे मुले, पुरुष गोलंदाजांच्या बरोबरीने मुली, महिला क्रिकेटपटूंना देखील ही संधी उपलब्ध होत आहे. १३ वर्षे पूर्ण ते ३० वर्षे वयोगटातील जलदगती गोलंदाज यासाठी पात्र असतील. आणखी खास बाब म्हणजे खुल्या वर्गातील विजेत्यास रुपये ५०००, उपविजेत्यास ३००० रुपयांचे बक्षीस मिळेल. तर १६ वर्षांखालील जलदगती गोलंदाजांसाठी हेच बक्षीस अनुक्रमे रुपये ३००० आणि रुपये २००० असे असेल. याव्यतिरिक्त पदक, देणगी कूपनही मिळणार आहे. तसेच पात्र खेळाडूंना शिष्यवृत्तीची संधी देखील आहे.

चाचणी कुठे होणार?

नाशिकच्या मखमलाबाद येथील क्रीडा सेंटर ऑफ क्रिकेट एक्सलन्स येथे २८ मे रोजी सकाळी आठ वाजल्यापासून ही सर्वात जलद गोलंदाजाचा शोध घेण्याची चाचणी येईल. १६ वर्षांखालील क्रिकेटपटूंसाठी १ सप्टेंबर २०११ ते ३१ ऑगस्ट २०१३ ही वयोमर्यादा असेल. तसेच ३० वर्षे वयोगटासाठी १ जानेवारी १९९६ नंतर जन्म झालेले खेळाडू पात्र असतील. अधिक माहितीसाठी 8007300368, 9370011676, 8862003478 या क्रमांकावर संपर्क साधावा, या विशेष संधीचा लाभ घेण्याचे आवाहन नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे करण्यात आले आहे.