शहराच्या चारही दिशांना मालमोटार टर्मिनस करण्याची गरज

शहरातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शहराच्या चारही दिशांना मालमोटार टर्मिनस करण्याची गरज आहे.

वाहतूकदार संघटनेची आयुक्तांशी चर्चा

नाशिक : शहरातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शहराच्या चारही दिशांना मालमोटार टर्मिनस करण्याची गरज आहे. आडगाव टर्मिनसचा विकास करण्यासह अंबड, चेहेडी आणि सिन्नर फाटा येथे टर्मिनस विकसित करण्यात यावे, अशी मागणी नाशिक जिल्हा वाहतूकदार संघटनेने के ली आहे. यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याशी चर्चा के ली. आडगाव मालमोटार टर्मिनस येथील गाळे धारकांना आकारण्यात आलेल्या घरपट्टीतील दुरुस्तीसह विविध समस्याही यावेळी मांडण्यात आल्या.

यावेळी आमदार सीमा हिरे, नाशिक जिल्हा वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड, सुभाष जांगडा,

गुरुमेलसिंग इप्पल, महेंद्रसिंग राजपूत, दीपक ढिकले, शंकर धनावडे, विनोदकुमार चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी मनपा आयुक्त जाधव यांच्याशी आमदार हिरे, गटनेते सतीश सोनवणे तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. मालमोटार टर्मिनसच्या ठिकाणी अधिक गाळ्यांची निर्मिती करण्याची सूचना करण्यात आली. गाळे माल वाहतूकदार घेतील. त्यातून मनपालाही अधिक उत्पन्न मिळेल. तसेच मालमोटार टर्मिनस शहराच्या बाहेर राहिल्यास अपघातांचे प्रमाण देखील कमी होईल, असे संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी सांगितले. आडगाव मालमोटार टर्मिनस येथे आकारण्यात आलेल्या घरपट्टीमध्ये दुरुस्ती करण्यात येऊन याठिकाणी आवश्यक सुविधा करण्यात याव्या, अशी मागणी त्यांनी केली.

याबाबत संघटनेचे अध्यक्ष फड आणि कार्याध्यक्ष सैनी यांनी महापौर कुलकर्णी तसेच आयुक्त जाधव यांना निवेदन दिले. निवेदनात संघटनेने भूमिका मांडली आहे. महानगरपालिका क्षेत्रातील आडगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मालमोटार टर्मिनस आहे. या टर्मिनसमध्ये महानगरपालिकेचे गाळे असून मालवाहतूकदारांना हे गाळे भाडेतत्वावर देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी कुठल्याही आवश्यक सुविधा नसतांना देखील हे गाळेधारक नियमितपणे गाळेभाडे भरतात. येथील गाळेधारकांना उद्भवत असलेल्या समस्यांबाबत संघटनेच्या वतीने निवेदन दिल्यानंतरही अद्याप सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाही. अशा परिस्थितीत येथील गाळेधारक काम करत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

या सर्व समस्या असतांना आता महानगरपालिकेच्या वतीने २०१२ पासूनची घरपट्टी देण्यात आलेली आहे. त्यामुळे गाळेधारक अधिक अडचणीत आले आहेत. एकीकडे करोनामुळे वाहतूक व्यवसायाचे कंबरडे मोडले असतांना त्यातून सावरणाऱ्या या उद्योगाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मनपाकडून आकारण्यात आलेल्या या घरपट्टीमुळे वाहतूकदार संघटना आणि गाळेधारकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. नाशिक मनपा जर घरपट्टी आकारणार असेल तर त्यांनी याठिकाणी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. घरपट्टी आकारताना ज्यावेळी गाळेधारकाने गाळे घेतले तेव्हापासून त्याला पट्टी लावण्यात यावी. मात्र अनेकांना चुकीच्या पद्धतीने घरपट्टी लावण्यात आली आहे. त्यात दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Need freight terminal all four directions nashik city ssh

ताज्या बातम्या