नाशिक – हिमस्खलनामुळे आलेल्या विनाशकारी महापुरात नेपाळमध्ये रस्ते, पूल, जलविद्युत प्रकल्प वाहून गेले. कित्येक किलोमीटर रस्ते गाळात गडप झाले. नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय अडकले असून, त्यात नाशिकच्या पेठ तालुक्यातील ११ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. गेल्या तीन दिवसांपासून हे विद्यार्थी काठमांडूत अडकले आहेत. या भयावह आपत्तीनंतर नेपाळमध्ये हॉटेलचे भाडे आणि इतर सर्वच गोष्टी महागल्या आहेत. सहलीचे पॅकेज संपल्याने हॉटेलचा आणि अन्य खर्च पडत असून, आम्ही आर्थिक अडचणीत सापडलो आहोत, अशी व्यथा विद्यार्थ्यांनी मांडली आहे. आम्हाला नेपाळमधून महाराष्ट्रात सुखरूप आणावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

नेपाळ-तिबेट सीमेवरील विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारत आणि महाराष्ट्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. या पर्यटकांमध्ये नाशिकमधील काही पर्यटकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने पेठ नगरपंचायत हद्दीतील ११ विद्यार्थी पर्यटक काठमांडू येथे अडकल्याची माहिती दिली. यामध्ये अर्जुन शिंदे, रोहित शिंदे, विशाल शिंदे, रुपेश घोंगे, अभिषेक पवार, आकाश कोतुळकर, ओम शिंदे, पियूष शिंदे, आयुष शिंदे, करण शिंदे आणि शुभम शिंदे यांचा समावेश आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी त्यांच्या संपर्कात आहेत.

विज्ञान आणि कला शाखेत पदवीचे शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांनी पैसे जमवून नेपाळ भ्रमंतीचा बेत आखला होता. ११ विद्यार्थ्यांचा गट २० ऑगस्टला नेपाळमध्ये फिरण्यासाठी गेला. नाशिकहून रेल्वेने गोरखपूर आणि तिथून पुढे ट्रॅव्हलर्सच्या टूर पॅकेजद्वारे त्यांनी नेपाळमध्ये प्रवेश केला. पाच दिवस फिरल्यानंतर ते परतीच्या प्रवासाला निघणार होते. त्याचवेळी नेपाळमध्ये महापुराची आपत्ती कोसळली.

सुनौली सीमेकडे जाणारे रस्ते बंद

मनकामना देवीचे दर्शन घेऊन आम्ही पूल ओलांडल्यानंतर अवघ्या दोन तासांत तो पूल आणि रस्ता वाहून गेला, असे अर्जुन शिंदे याने सांगितले. राडारोडा आणि गाळ साचल्याने नेपाळ-भारतदरम्यानच्या सुनौली सीमेकडे जाणारा मुख्य रस्ता आणि इतर मार्ग पूर्णपणे बंद आहेत. रस्ते पूर्ववत होण्यासाठी १० ते १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता स्थानिक प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे. आधी हॉटेलचा खर्च टूर पॅकेजमध्ये समाविष्ट होता. पॅकेजचा कालावधी पूर्ण झाल्याने आता हॉटेलचा खर्च आमच्यावर आला आहे, असे शिंदे याने सांगितले.

पॅकेज संपले, हॉटेलचा खर्च विद्यार्थ्यांच्या खिशावर

सहलीचे पैसे भरल्यानंतर जेमतेम पैसे घेऊन आम्ही नेपाळला आलो होतो. अशा प्रकारे मुक्काम वाढेल, याची कुणालाही कल्पना नव्हती. अकस्मात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे नेपाळमधील हॉटेलच्या भाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. दररोज चार ते पाच हजार रुपये मोजावे लागत आहेत. पाण्याचा प्रवाह आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने आमच्यासह नाशिकमधील कुटुंबीयांमध्येही अस्वस्थता आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. फोनवरून चौकशी होत असली तरी आम्हाला सुखरूप भारतात आणण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी अर्जुन शिंदे याने विद्यार्थ्यांच्या वतीने केली.