scorecardresearch

नववर्ष स्वागतयात्रांना अखेर परवानगी

एखादी खासगी संस्था नववर्षांनिमित्त सलग पाच दिवस सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करणार असताना समस्त नाशिककरांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून पोलीस परवानगी देताना दक्षता बाळगत आहेत.

आयोजकांकडून दबाव तंत्राचा वापर; पोलीस आयुक्तांचा आरोप

नाशिक : एखादी खासगी संस्था नववर्षांनिमित्त सलग पाच दिवस सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करणार असताना समस्त नाशिककरांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून पोलीस परवानगी देताना दक्षता बाळगत आहेत. या घटनाक्रमात चर्चेसाठी निमंत्रण देऊनही आयोजकांनी भेटणे टाळले. त्यांना पोलिसांशी माध्यम युद्ध खेळण्यात रस असून संबंधितांची भाषा धमकावणीची असल्याचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डय़े यांनी सूचित केले. पोलीस परवानगीशिवाय मिरवणूक, आंदोलन, मोर्चे आदींवरील बंदीचा करोनाच्या नियमावलीशी संबंध नाही. या आदेशामुळे वर्षभरात शहरातील कुठल्याही रस्त्यांवर अडथळे आले नसल्याचा दावा त्यांनी केला. वेगवेगळय़ा भागातील नववर्ष स्वागत यात्रांना परवानगी दिली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पोलिसांच्या दप्तर दिरंगाईमुळे नववर्ष स्वागत यात्रा आणि त्या अनुषंगाने २९ मार्चपासून गोदा घाटावर एक हजार ढोल समूहांचे महावादन, एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असणारा अंतर्नाद, २५ हजार फूट आकाराची महारांगोळी आदी कार्यक्रम रद्द केल्याचे नववर्ष स्वागत यात्रा समितीने जाहीर केले होते. परवानगीसाठी तीन दिवस पाठपुरावा करूनही पोलिसांनी आडकाठी केली, अपमानकारक वागणूक दिल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला होता. सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही अनावश्यक कागदपत्रांची मागणी केली गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त पाण्डय़े यांनी पत्रकार परिषदेत आयोजकांच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले.
आयोजक परवानगीसाठी धमकावत दबाव तंत्राचा पायंडा पाडत आहे. दोन, चार आयोजक समस्त नाशिककरांचे प्रतिनिधी ठरू शकत नाहीत. राज्य घटनेने दिलेले अधिकार आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार १७ फेब्रुवारी २०२१ मध्ये पोलीस आयुक्तांच्या परवानगशिवाय मोर्चे, मिरवणूक, मेळावे, आंदोलन, शोभा यात्रा व इतर कोणत्याही कारणावरून जमावास बंदी घालण्यात आली. त्याबद्दल वर्षभरात कुणी तक्रार केलेली नाही. या काळात एकूण ८३३ अर्ज प्राप्त झाले. त्यातील ५९८ अर्जदारांना परवानगी दिली गेली. २३५ प्रकरणात परवानगी नाकारली. म्हणजे ७५ टक्के कार्यक्रमांना परवानगी दिली गेली. ज्यांच्यामुळे स्थानिकांना त्रासाला तोंड द्यावे लागले, अशा ७० प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले. या आदेशामुळे शहरवासीयांना वाहतुकीसाठी मुक्त रस्ते उपलब्ध झाले. कुठेही आंदोलन, मिरवणूक वा तत्सम अडथळय़ांना तोंड द्यावे लागले नाही. असे असताना नववर्ष स्वागत समितीला विहित मार्गाचा अवलंब करण्यात रस नसल्याचे पाण्डय़े यांनी सूचित केले. पोलीस आयुक्तपदी आपण असेपर्यंत ही नियमावली कायम राहणार असल्याचे त्यांनी ठणकावले.
हेल्मेट सक्ती, फलकांबाबच्या नियमावलीने चांगली शिस्त लागत आहे. याआधी शहरात अण्णा, दादांचे वाढदिवस विनापरवानगी फलकांवर साजरे केले जात होते. पोलिसांनी अधिसूचना काढल्याने या प्रकारांना चाप लागून शहराचे विद्रुपीकरण थांबल्याचे पाण्डय़े यांनी म्हटले आहे. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक झाल्याचा आनंद पंडित कॉलनीत जल्लोषात ढोल ताशा वाजवून साजरा करण्यात आल्याच्या घटनेची माहिती घेऊन कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
जाणीवपूर्वक संभ्रम पेरणी
आयोजक खासगी संस्थेचे काही पदाधिकारी समस्त नाशिककरांचे प्रतिनिधी होऊ शकत नाही. सार्वजनिक स्थळी होणाऱ्या कार्यक्रमास २२ लाख नाशिककरांचा विचार करून परवानगीचा विचार केला जातो. आयोजकांना कार्यक्रमांपेक्षा माध्यम लढाई खेळण्यात अधिक रस आहे. त्यांची भाषा धमकावणीची आहे. पोलिसांविषयी जाणीवपूर्वक संभ्रम पेरला जात आहे. आयोजक संस्थेचे चार लाख रुपये वार्षिक उत्पन्न असून उत्पन्नाचे स्त्रोत, कार्यक्रमाचा खर्च, धर्मदाय आयुक्तांकडे अहवाल दिला जातो की नाही आदींची पडताळणी केली जाईल. तथापि, चर्चेसाठी बोलावूनही ते आले नसल्यावर आयुक्त पाण्डय़े यांनी बोट ठेवले.
स्वागत यात्रा समितीचे आक्षेप कायम
पोलीस आयुक्तांनी नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या सदस्यांनी आपल्याकडे संपर्क केला नाही, असा चुकीचा आरोप केल्याचे नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी म्हटले आहे. ५ मार्च रोजी परवानगीसाठी कागदपत्रे सादर केली गेली. अलीकडेच पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी कित्येक तास बसूनही ती मिळाली नाही. आजवर विनंतीच्या सुरातच परवानगीची मागणी करण्यात आली. आज, उद्या या असे सांगत अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली. याची आयुक्तांनी चौकशी करावी. स्वागत यात्रेच्या परवानगीसाठी लक्ष्मण सावजी, खा. हेमंत गोडसे, पालकमंत्री छगन भुजबळ या सर्वानी प्रयत्न करूनही त्यांना यश आले नाही तर सामान्य व्यक्तींनी काय करावे, असा प्रश्न संचेती यांनी उपस्थित केला. एवढय़ा मोठय़ा पदावरील आयपीएस अधिकाऱ्याने उद्विग्न होऊन अशा प्रकारची पत्रकार परिषद घेणे दुर्देवी आहे. पोलीस आयुक्तांची बदली व्हावी ही आमची इच्छा नाही किंवा उद्देशही नाही. त्यांची बदली झाली तर ती त्यांच्या कर्तृत्वाने होईल, असे समितीचे सचिव जयंत गायधनी यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: New year receptions finally allowed use pressure techniques organizers allegation commissioner of police amy

ताज्या बातम्या